दादरा नगर हवेतीतील लोकसभा पोट निवडणुकीसाठी प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. शिवसेनेनं या निवडणुकीत उमेदवार उभा केल्यामुळे या निवडणुकीत वेगळीच रंगत आली आहे. त्यामुळ महाराष्ट्रातील निवडणुकांनंतर हा दोन्ही पक्ष या पोट निवडणुकीत पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकल्यानं दोन्ही बाजूंनी पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान आज भाजपाची दादरामध्ये जाहीर सभा झाली. या सभेमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे.
मोदींचं नाव घेऊन निवडून आले आणि…
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकांवेळी झालेल्या चर्चेचा उल्लेख केला. “ते मोदींचं नाव घेऊन निवडून आले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन बसले. हे लोक फक्त संधीसाधू आहेत. जेव्हा त्यांना निवडणुका लढायच्या असतात, तेव्हा मोदींची आठवण येते आणि निवडणुका झाल्यावर त्यांना सत्ता दिसू लागते”, असं फडणवीस म्हणाले.
शिवसेनेचं सरकार हे वसुली सरकार झालंय
शिवसेनेकडून महाराष्ट्रात वसुली सरकार चालवलं जात असल्याचं देखील फडणवीस यावेळी म्हणाले. “शिवसेनेचा मुंबईचा इतिहास पाहा. तिथे ते करत असलेलं काम पाहा. जसं तिथे त्यांचं काम सुरू आहे, वसुली सुरू आहे, ते पाहाता महाराष्ट्रातलं सरकार आता सरकार नसून वसुली सरकार झालं आहे. तीच वसुली ते दादरा-नगर हवेलीत आणू इच्छित आहेत”, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
…तर मोघलांचं काम करतील!
दरम्यान, शिवसेनेच्या कारभाराला फडणवीसांनी यावेळी बोलताना मोघलांची उपमा दिली. “ते जिथे आहेत, त्यांना तिथेच ठेवा. ते इथे आले, तर नाव तर महाराष्ट्राचं घेतील, पण काम मोघलांचं करतील”, असा टोला फडणवीसांनी लगावला.
खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यानंतर दादरा नगर हवेलीमध्ये पोटनिवडणूक प्रलंबित होती. ही निवडणूक आता होत असून त्यासाठी भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांन प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. कलाबेन डेलकर यांनी अलिकडेच शिवसेनेत प्रवेश केला आहे. येत्या ३० ऑक्टोबर रोजी या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे.