राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन गेल्या आठवड्यापासून (२७ जून) सुरू झालं आहे. या अधिवेशनात आतापर्यंत अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आणि अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील ‘लाडकी बहीण’ योजनेची राज्यभर चर्चा चालू आहे. अशीच चर्चा आणखी एका गोष्टीची होतेय, ती म्हणजे विधान भवनात झालेली उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट. ठाकरे गटाचे प्रमुख तथा विधान परिषदेचे आमदार उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र भाजपातील वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची विधान भवनाच्या इमारतीमधील लॉबीत भेट झाली. दोघांनी एकाच लिफ्टने प्रवासही केला. या भेटीदरम्यान दोन नेत्यांमध्ये काय चर्चा झाली असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र हे दोन्ही नेते आणि त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी देखील यावर भाष्य करून सर्व प्रकारच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला. मात्र आता पुन्हा एकदा या भेटीची चर्चा होऊ लागली आहे.
विधान भवनाच्या इमारतीत लिफ्टसमोरच्या लॉबीमध्ये जिथे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेटले होते. तिथेच आज ठाकरे गटातील नेते व वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आमने-सामने आले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेलं संभाषण पाहून अनेकांना हसू आवरलं नाही. विधान भवन परिसरात आदित्य ठाकरेंना पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य यांना नमस्कार केला. आदित्य ठाकरे यांनीही फडणवीसांना नमस्कार केला. त्यानंतर फडणवीस आदित्य ठाकरेंना म्हणाले, “काय चाललंय?” त्यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, “मी लिफ्टमधून चाललोय”. आदित्य ठाकरेंचं उत्तर ऐकून फडणवीस आणि त्यांच्याबरोबर लॉबीमध्ये उभे असलेले इतर नेते खळखळून हसले. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी फडणविसांना विचारलं, “तुम्हीही लिफ्टमधून येताय का?”
विधान भवनातील लिफ्टसमोरच्या लॉबीमध्ये हे सगळं संभाषण चालू होतं. यावेळी आदित्य ठाकरेंबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तर, फडणवीस यांच्याबरोबर भाजपा आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. या हलक्याफुलक्या संभाषणापूर्वी विधान परिषदेत फडणवीस आणि प्रसाद लाड यांनी अंबादास दानवे यांच्यावर काल केलेल्या वक्तव्याप्रकरणी (सभागृहातील शिवीगाळ प्रकरण) कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार दानवेंचं पाच दिवसांसाठी विधीमंडळातून निलंबन करण्यात आलं आहे. सभागृहात भांडणारे हे दोन्ही नेते (दानवे आणि फडणवीस) विधान भवनाच्या लॉबीत मात्र शांतपणे चर्चा करताना दिसले.
हे ही वाचा >> मोठी बातमी! अंबादास दानवेंचं पाच दिवसांसाठी निलंबन; विधानपरिषदेत ठराव संमत
ठाकरे-फडणवीसांच्या भेटी, शिवसेना-भाजपा हातमिळवणी करणार का? संजय राऊतांनी दिलं उत्तर
संजय राऊत म्हणाले, आम्ही कधीच भाजपाबरोबर हातमिळवणी करणार नाही. अनेकदा दिल्लीत आम्ही संसदेत असताना सभागृहाकडे जाणाऱ्या लिफ्टमध्ये आमच्याबरोबर वेगवेगळे नेते असतात. त्यामध्ये अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील आमच्याबरोबर लिफ्टमध्ये असतात. संसद असो अथवा विधान भवन तिथली व्यवस्था तशीच आहे. तुम्हाला एकत्रच ये-जा करावी लागते. तिथे आलेल्या प्रत्येकाला एकाच सभागृहाकडे जायचं असतं. त्यामुळे लिफ्टमध्ये कोणीही भेटल्यावर हस्तांदोलन करणे, नमस्कार करणे हा शिष्टाचार असतो. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांना नमस्कार केला असेल तर त्याची आज राजकीय चर्चा करण्याची, तर्कवितर्क लावण्याची आवश्यकता नाही. मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की आम्ही कोणत्याही परिस्थितीत पुन्हा भाजपाबरोबर हात मिळवणार नाही. आम्ही आमचे हात अपवित्र करून घेणार नाही.