Devendra Fadnavis Latest News : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (५ डिसेंबर) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांच्याबरोबरीने शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीदेखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदान येथे झालेल्या या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.
२०१९ पासून काही वर्ष संघर्षामध्ये गेले, आज मुख्यमंत्री म्हणून पहिली सही करताना तुमच्या भावना काय होत्या? असा प्रश्न मुख्यमंत्री बनल्यानंतर आयोजित पहिल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. फडणवीस म्हणाले की, “आज मी जी पहिली सही केली ती मुख्यमंत्री आरोग्य कक्षातील एका कॅन्सर रुग्णाला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करण्यासाठी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधितून देण्याचा निर्णय मी घेतला आहे.”
माझ्याकडे खूप अनुभव असला तरीही यावेळी मी एक प्रकारचं प्रेशर अनुभवत असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले. “मला अनुभव खूप आहे. मागच्या दहा वर्षात मी अडीच वर्ष विरोधी पक्षनेता होतो, पण साडेसात वर्ष मी सरकारमध्ये होतो. मला सरकारचा अनुभवदेखील खूप आहे. पण ज्या प्रकारचे बहुमत यावेळी मिळालं आहे, मला असं वाटतं की त्या बहुमताचं एक प्रेशर, लोकांच्या प्रेमाचे प्रेशर आमच्यावर आहे आणि मी ते अनुभवत आहे.”
फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, “जेव्हा अपेक्षा मोठ्या असतात तेव्हा आव्हान देखील मोठी असतात, कारण लोक तुमच्याकडून अपेक्षा करत असतात, त्यामुळे त्याचं प्रेशर निश्चित माझ्यावर आहे.”
हेही वाचा>> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचं वक्तव्य, “२१०० रुपये…”
पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाइलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधितून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.