महाविकास आघाडी सरकारमधील राजकीय नेत्यांचे दूरध्वनी अभिवेक्षण ( फोन टॅपिंग ) प्रकरणी पुण्याच्या तत्कालिन पोलीस आयुक्त रश्मी शुक्लांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास बंद करण्यात येत आहे. तसा अहवाल ( क्लोजर रिपोर्ट ) न्यायालयात सादर करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध पत्रकार परिषद घेतली. यावेळी रश्मी शुक्ला यांच्यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, “कोणताही अहवाल सादर होतो, तेव्हा तो पुराव्यांच्या आधारावर होतो. तत्कालिन पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांना सुपारी देऊन रश्मी शुक्ला आणि अनेक अधिकाऱ्यांविरोधात कुंभाड रचण्यात आले. याचे अनेक पुरावे बाहेर आले आणि आणखी पुढच्या काळात येणार आहेत,” अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर केली.
हेही वाचा – “राष्ट्रवादी व्यावसायिक पक्ष”, देवेंद्र फडणवीसांची टीका, म्हणाले, “सेनेतील फुटीला…”
“कोणत्याही अधिकार्यावर अकारण…”
“पोलीस पुराव्यांच्या आधारावर काम करत असते आणि न्यायालय कायद्यानुसार निर्णय घेते. आम्ही कोणत्याही अधिकार्यावर अन्याय करणार नाही. अथवा कोणत्याही अधिकार्यावर अकारण अन्याय होऊ देणार नाही,” असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.
काय आहे प्रकरण?
राज्यातील काँग्रेसचे नेते नाना पटोले, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप केल्या प्रकरणी तत्कालिन पोलीस आयुक्त रश्मी शुक्लांविरोधात ठपका ठेवण्यात आला होता. विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उच्चस्तरीय समितीने अहवाल सादर केला होता. त्यानंतर शुक्लांंविरोधात राज्य शासनाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात शुक्लांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.