महाविकास आघाडीने मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला. तसे टार्गेट माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना देण्यात आले होते, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर आता फडणवीस यांनी पुन्हा एकदा असाच आरोप केला असून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. मला तुरुंगात टाकण्याचा महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न केला. मात्र मी त्यांच्या बापाला घाबरत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते आज (११ फेब्रुवारी) नाशिकमध्ये भाजपा कार्यर्त्यांना संबोधित करत होते.
हेही वाचा >>> “…तर माझ्यासमोर मोदी फार मोठी गोष्ट नाही” प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान; मांडलं विजयाचं नेमकं गणित, थेट आकडेवारीच दिली!
या महाराष्ट्राने तेवढा भ्रष्टाचार कधीही पाहिला नाही
“आपलं तीन पायांचं सरकार कधी गडगडेल हे माहिती नसल्यामुळे त्यांनी भ्रष्टाचाराचा टी-२० सामना खेळला. त्यांनी रोज भ्रष्टाचार केला. या महाराष्ट्राने तेवढा भ्रष्टाचार कधीही पाहिला नाही. त्यांच्या सरकारमध्ये केवळ भ्रष्टाचारच नाही तर अनाचार, दुराचारही होता. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर केसेस टाकण्याचा प्रयत्न केला,” असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
हेही वाचा >>> मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवारांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “९ महिन्यांत तर…”
अख्खे सरकार मला तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्न करत होते
“भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. मी यांच्या बापाला घाबरत नाही. मी याआधी कधीही बोललो नव्हतो. मात्र त्यांनी मला जंग-जंग पछाडलं. त्यांचे अख्खे सरकार मला तुरुंगात टाकण्यासाठी पाठीमागे लागले होते. मात्र ते काहीच करू शकले नाही. यांनी ज्यांना मला तुरुंगात टाकण्याची जबाबदारी दिली होती, ते तुरुंगात गेले. मात्र मी तुरुंगात गेलो नाही,” असेही फडणवीस म्हणाले.
त्यांनी शेतकऱ्यांना एक फुटकी कवडी दिली नाही
महाविकास आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात कोणताही विकास केला नाही. अडीच वर्षे राज्यातील विकास ठप्प होता, असा दावाही फडणवीस यांनी केला. “आपले सरकार आल्यानंतर सहा महिन्यांत आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना १० हजार कोटी रुपयांची मदत दिली. अतिवृष्टीचे आपणच पैसे दिले. त्यांनी तीन-तीन वेळा त्याच घोषणा केल्या. त्यांनी टाळ्या वाजवून घेतल्या. मात्र त्यांनी शेतकऱ्यांना एक फुटकी कवडी दिली नाही. तेच पैसै आज आपण शेतकऱ्यांना देत आहोत. त्यांनी वेगवेगळी कामं थांबवून ठेवली होती. सिंचन विभागातील एकाही प्रकल्पाला त्यांनी अडीच वर्षांच्या काळात मान्यता दिली नाही,” असे फडणवीस म्हणाले.