Devendra Fadnavis on Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर दिले. यावेळी राहुल गांधी यांनी चीनपासून ते बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवर भाजपा सरकारवर टीका केली. या भाषणात राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अचानक वाढलेल्या मतदारांच्या संख्येबाबत काही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी मतदार याद्यांमध्ये फेरफार झाल्याचा आरोपही केला. दरम्यान राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर भारतीय जनता पक्षाकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केल्याचा आरोप करत राहुल गांधींनी माफी मागवी अशी मागणी केली आहे. “महाराष्ट्राचा अपमान करण्याऐवजी आत्मपरीक्षण करा” , असे फडणवीस म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल गांधी काय म्हणाले?

राहुल गांधी लोकसभेत बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीमधील पाच महिन्यांत मतदारांची संख्या सुमारे ७० लाखांनी वाढली. फेरफार झाल्याचा आरोप करत त्यांनी यासंबंधी आकडेवारी विश्लेषणासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी देखील त्यांनी केली. राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले की ते आरोप करत नाहीयेत मात्र आयोगाने यावर उत्तर दिले पाहिजे.

राहुल गांधी म्हणाले की, “मला महाराष्ट्र निवडणुकीबद्दल बोलायचे आहे. जवळपास हिमाचल प्रदेशच्या संपूर्ण लोकसंख्ये इतके मतदार महाराष्ट्राच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले. लोकसभा निवडणुकीनंतर, विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात ७० लाख नवे मतदार अचानक तयार झाले”. राहुल गांधी यांचे म्हणणे होते की, महाराष्ट्रात पाच वर्षांच्या कालावधीत जेवढे मतदार वाढले नाहीत त्याहून जास्त मतदार अवघ्या पाच महिन्यांत वाढले.

दरम्यान राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर भाजपाकडून त्यांच्यावर महाराष्ट्राचा अपमान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्राचा अपमान करण्याऐवजी आत्मपरीक्षण करा! तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, वीर सावरकर यांच्या भूमीचा, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला आहे. तुमच्या पक्षाचा पराभव झाल्यामुळे तुम्ही महाराष्ट्रातील जनतेने एनडीएला लोकशाहीच्या मार्गाने दिलेल्या जनादेशावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे”.

“आत्मनिरीक्षण करण्याऐवजी तुम्ही चिखलफेक करत आहात. यासाठी महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही. राहुल गांधी माफी मागा!”, असेही फडणवीस म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis alleges rahul gandhi insulted the people of maharashtra over assembly election remark rak