Devendra Fadnavis and Eknath Shinde Meet: विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन करण्यासाठी नेत्यांमध्ये हालचाली सुरु आहेत. ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, हे सर्व सुरु असताना विधानसभेचा निकाल लागून आठ दिवस झाले तरी अद्याप सरकार स्थापन न झाल्यामुळे महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याची चर्चा आहे. यातच महायुतीत शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मंत्रिमदावरून रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जात आहे. तसेच एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदासाठी आग्रही आहेत, तर गृहमंत्री पद सोडण्यास भाजपा तयार नसल्याचं सांगितलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या पार्श्वभूमीवर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक देखील पार पडली होती. मात्र, या बैठकीनंतरही महायुतीमधील तिढा सुटला नाही अशी चर्चा आहे. यातच एकनाथ शिंदे हे गेल्या दोन दिवसांपासून आजारी आहेत. तसेच त्यांनी रुग्णालयात दाखल होत उपचार घेतल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर आज एकनाथ शिंदे हे वर्षा या निवासस्थानी दाखल झाले. वर्षा निवासस्थानी दाखल झाल्यानंतर भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: वर्षा निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतली.

हेही वाचा : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद; म्हणाले, “आमच्याकडे राजकारण…”

या भेटीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास आर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याचा तपसील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, या भेटीनंतर तरी महायुतीतील तिढा सुटणार का? मंत्रि‍पदांचा आणि खातेवाटपाचा तिढा सुटणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, शिंदे आणि फडणवीसांच्या भेटीवरून शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी प्रतिक्रिया देत फडणवीसांनी भेट का घेतली? याविषयी माहिती सांगितली आहे.

किरण पावसकर काय म्हणाले?

“एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. महायुतीमध्ये कधीही नाराजी नव्हती आणि नाही. नाराजीचा काही प्रश्न नाही. एकनाथ शिंदे यांची तब्येत व्यवस्थित नव्हती. त्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र, माध्यमात चर्चा झाल्या की ते नाराज आहेत. महाराष्ट्रातील जनतेने भरभरून एवढं त्यांना मतदान केलं. तसं येणारा कार्यक्रम देखील मोठा व्हावा आणि त्यामध्ये शिवसेना देखील असणार आहे”, असं किरण पावसकर यांनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंची भेट का घेतली?

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची आज वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये महायुतीच्या सरकार स्थापनेबाबत चर्चा सुरु असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या भेटीसंदर्भात बोलताना किरण पावसकर यांनी म्हटलं की, “कोणत्याही मागण्यांसाठी महायुतीचं सरकार अडलेलं नाही. गिरीश महाजन यांनी देखील काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल झाले आहेत”, असं त्यांनी म्हटलं.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणाला संधी दिली जाणार?

किरण पावसकर यांनी पुढे म्हटलं की,”आमच्याकडून सांगण्यासारखी एक गोष्ट राहिली की, ज्या मंत्र्यांचं चारित्र्य चांगलं आहे. त्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप नाहीत. अशा लोकांनाच पुन्हा संधी द्यावी, अशी एक कल्पना समोर आलेली आहे”, अंसं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis and eknath shinde meet maharashtra chief ministership in mahayuti politics updates in mumbai gkt