बीड आणि माजलगाव या ठिकाणी जी जाळपोळ झाली त्यावरुन आज देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांच्यात विधानसभेत खडाजंगी झाल्याचं पाहण्यास मिळालं. हल्लेखोरांनी सीसीटीव्ही फोडले गेले देवेंद्र फडणवीस यांनी निवेदनात सांगितलं. दंगल करणाऱ्यांची संख्या आणि त्यांच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी होती. हे सगळं पूर्वनियोजित होतं का? तेदेखील आम्ही तपासतो आहोत. काही लोक फरार आहेत. त्यावेळी मास्टरमाईंडच्या संशयाचं निरसन होईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यामध्ये जो कुणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई होईल हे मी सांगू इच्छितो असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्यावर जयंत पाटील यांनी असं म्हटलं आहे की गुप्तचर यंत्रणेला याची माहिती नव्हती हे काही मला खरं वाटत नाही.
काय म्हणाले जयंत पाटील?
बीडच्या पोलीस अधीक्षकांना बीड जिल्ह्यात काहीतरी होऊ शकतं अशी वॉर्निंग होती. त्यांना हे कळवण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडून हलगर्जीपणा झाला. सकाळी माजलगावला जाऊन प्रकाश सोळंकींच्या घराला आग लावली गेली. त्यावेळी तिथे फुटेजमध्ये पोलीस दिसत आहेत. बीड शहर जळत असताना जिल्हा पोलीस अधीक्षक बीडला आले नाहीत. पोलीस कमी होते हे जे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्यावर मी हे सांगेन की पोलीस लोकसंख्येच्या तुलनेत कमीच असतात. त्याना जरब बसण्यासाठी हवेत गोळीबार का केला नाही? पोलीस ५० च असतात ५ हजारचा मॉब असला तरीही. पोलिसांनी हवेत गोळीबार करुन जरब का बसवली नाही? राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय जाळण्यात आलं. जयदत्त क्षीरसागर, सोळंकी यांची घरं जाळली. शहरात जमाव फिरत होता. नंबर दिले गेलेले होते आणि सगळे फिरत होते. शहरात गर्दीचा जमाव फिरत होते. तरीही विधानसभेच्या सदस्यांना आपण देऊ शकलो नाही तर लोकांची गोष्टच येत नाही. माझा प्रश्न आहे की गोपनीय शाखेला ही माहिती होती. संपूर्ण माहिती होती, मी स्वतः सात ते आठवेळा फोन केला त्यांनी फोन घेतला नाही. संदीप क्षीरसागर यांच्या घरात मुलं आणि त्यांची पत्नी होती. त्यासाठी फोन करत होतो. पालकमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली तरीही ती स्थापन झालेली नाही. याचं कारण काय आहे याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे. आंतरवाली सराटीला लाठीचार्ज झाला त्याची न्यायालयीन चौकशी करा ही मागणीही करण्यात आली होती. मॉब फिरत होता तर फायरिंग केलं असतं तर तो जमाव पांगला असता. पप्पू शिंदे नावाचा एक कॉ ओर्डिनेटर आहे. तो एका राजकीय पक्षाच्या नेत्याचा भाचा आहे. पप्पू शिंदे आणि त्याच्याबरोबरची गँग हे सगळं घडवत होती. छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेली भावना योग्यच आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातले छगन भुजबळ गेले पण गृहमंत्री का गेले नाहीत? बैठक झाली तेव्हा त्यात काय झालं? पप्पू शिंदेचे लागेबंधे कुणाशी आहेत ते फडणवीस यांनी सांगावं. पप्पू शिंदे कुणाचा माणूस आहे ते फडणवीसांनी खासगीत सांगावं कारण ते सभागृहात सांगू शकणार नाहीत असंही जयंत पाटील म्हणाले. सराईत गुन्हेगार सापडले म्हणत आहात. तर मग पोलिसांना ते दिसले नव्हते का? पोलिसांनी त्यांचा कार्यक्रम का केला नाही? महाराष्ट्रातले पोलीस बघ्याच्या भूमिकेत का आहेत? पोलीस अशा गोष्टी थांबवत नसतील तर दुर्दैव आहे. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था ढासळला आहे हे या घटनेने दाखवलं. पप्पू शिंदे आणि गँग यांचे लागेबांधे हेदेखील स्पष्ट झाले पाहिजेत अशी मागणी जयंत पाटील यांनी केलं.
देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर
अध्यक्ष महोदय आणि जयंत पाटील यांना मी सांगू इच्छितो तुम्ही कागदपत्रं पडताळून पाहा. कुठलीही माहिती किंवा अलर्ट पोलिसांनी मिळालेला नाही. जी काही क्लिप वगैरे झाली ती वेगळी होती. मॉब नंतर गेला, बीडचा कुठलाही इंटलिजन्स नव्हता. बीडमध्ये पोलिसांनी गोळीबार का केला नाही? हे तुम्ही म्हणता पण पोलिसांनी परिस्थिती पाहून निर्णय घेतला असेल. आंतरवली सराटीत ७० पोलीस जखमी झाले तेव्हा जो लाठीचार्ज केला त्यावर राज्यातल्या मोठ्या नेत्यांनी पोलिसांनाच टार्गेट केलं. जयंत पाटील यांची भावना योग्य आहे. यामध्ये कडक कारवाई करता आली असता. पाच हजार लोकांचा मॉब आहे. आपणही गृहमंत्री होतात आपल्याला कल्पना आहे. एके ठिकाणी पाच हजार लोक होते आणि एके ठिकाणी दीड हजार लोक होते. तुम्ही तिकडे नव्हतात तुम्हाला काय माहीत आहे? सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळं थोडंच येतं? FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट त्याच्यात अनेकांची नावंही नाहीत. नंतर कारवाई केली जाते. FIR मध्ये सगळ्या गोष्टी त्यात नसतात. त्यामुळे या ठिकाणी जयंत पाटील यांना सांगू इच्छेन की अधिकची कारवाई व्हायला हवी होती. मी पालकमंत्र्यांशीही चर्चा केली होती. पण एका लेव्हलला आपला तपास पोहचला आहे. माझी हरकत नाही पुढच्या दोन दिवसात आम्ही एसआयटी स्थापन करु जर सभागृहाची इच्छा आहे तर. दुसरं असं की जयंत पाटील यांनी पप्पू शिंदेबाबतच का विचारलं? मी नावं सांगू? फोटो दाखवू? याला राजकीय वळण देऊ नका. सुरज चुंगडे कोण आहे? शिराळे कोण आहे? असं नको ना? हा राजकीय विषय नाही. माझ्याकडे सगळे फोटो आहेत कुणाबरोबर कोण उभं आहे. जे काही घडलं आहे त्यावर आम्ही कारवाई करणारच. कुठल्याही आरोपीला सोडणार नाही म्हणजे नाही.