शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत येथे शनिवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमाकडे भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार पंकजा मुंडे या नेत्यांनी पाठ फिरविली. दोन दिवसांपासून महायुतीच्या कार्यक्रमांना नेत्यांनी जायचे की नाही यावरून संभ्रम होता, असे वक्तव्य कार्यक्रमाला उपस्थित केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. या वक्तव्याने शिवसेना-भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याच्या चर्चेला अप्रत्यक्ष दुजोरा मिळाला.
राज्यात महायुतीची सत्ता येताच औरंगाबाद शहर पर्यटन हब करण्यात येईल, अशी घोषणा ठाकरे यांनी या कार्यक्रमात बोलताना केली. राज्याच्या विकासाचा आराखडा तयार केला आहे. त्यात रंग भरण्याचे काम अजून बाकी आहे. सत्ता येणारच आहे. त्यामुळे विकासाची कामे होतील, असे ते म्हणाले.
शहरातील सिद्धार्थ उद्यानात समांतर जलवाहिनी व मलनि:सारण सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमपत्रिकेत फडणवीस व पंकजा मुंडे यांची नावे होती. या वेळी बोलताना दानवे यांनी चांगलीच रंगत आणली. शहराच्या विकासासाठी सतत ‘मिळून’ प्रयत्न करायला हवेत, असे त्यांनी सांगितले. ‘मिळून’ या शब्दावर दानवे यांनी खासा जोर दिला. खासदार चंद्रकांत खैरे यांनाही त्यांनी चांगलेच टोले लगावले. ‘खैरेसाहेब, आता मी राज्यमंत्री आहे. माझ्या खात्याचा उपयोग काय, असे माझ्या कार्यकर्त्यांना वाटते. तसेच खैरे यांनाही वाटत असेल. पण मी सगळ्या नटबोल्टासाठी लागणारा पाणा आहे. त्यामुळे मला विचारले तर मी मदत करेन. कारण तू मला विचारले तर मी तुला विचारेन, असा राजकारणाचा नियम असतो. त्यामुळे माझ्याकडे याल तर तुमचे काम होईल,’ असे दानवे म्हणाले.
तत्पूर्वी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून औरगाबाद शहराच्या विकासासाठी विमानतळ अधिकाऱ्यांनी बैठक घेतल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभरात या विमानतळावरून परदेशात प्रवास करता येईल आणि परदेशातून आलेली विमाने औरंगाबादला उतरतील, असे सांगितले.
कार्यक्रमाच्या पाश्र्वभूमीवर ‘चला महाराष्ट्र घडवू या’ या घोषवाक्यातून उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र असणारे फलक शहरभर लावण्यात आले. त्यावर भाष्य करण्यास भाजप नेत्यांनी नकार दिला. मात्र, समांतर जलवाहिनी भूमिपूजन कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती जाणीवपूर्वक असल्याचा दानवे यांनी केलेला उल्लेख बरेच काही सांगून जाणारा होता. दानवे यांच्या या वक्त्यव्यावर उद्धव ठाकरे मात्र फार बोलले नाहीत. मात्र, रावसाहेबांना उद्देशून ‘काही लोकांचे मंत्री होण्याआधीच हवेत असतात. तुमचे मात्र तसे नाही’ एवढाच उल्लेख त्यांनी केला.
कार्यक्रमपत्रिकेत फडणवीस व पंकजा मुंडे यांची नावे आवर्जून असावीत, असा भाजप पदाधिकाऱ्यांचा हट्ट होता. मात्र, ते न आल्याने धुसफूस चव्हाटय़ावर आली. खासदार चंद्रकांत खैरे, राजकुमार धूत, आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, आर. एम. वाणी आदींची उपस्थिती होती.
‘पवार, तटकरेंची चौकशी व्हावीच’
जलसंपदा विभागाच्या १२ प्रकल्पांतील भ्रष्टाचारप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच माजी जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची चौकशी झाल्यास ‘दूध का दूध पानी का पानी’ होण्यास मदतच होईल, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनीही चौकशीच्या मागणीचे समर्थन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा