Devendra Fadnavis on Vijay Wadettiwar Statement over Pahalgam Terror Attack : काश्मीरमधील पहलगाम येथे गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एकूण २६ जण ठार झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटक होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, या हल्ल्यातून बचावलेल्या एका महिलेने प्रसारमाध्यमांसमोर सांगितलं होतं की एकूण चार दहशतवाद्यांनी आमच्यावर हल्ला केला होता. त्यांनी पर्यटकांना आधी धर्म विचारला, त्यानंतर गोळीबार केला. तुम्ही हिंदू आहात का? असं विचारून जे हिंदू होते त्यांच्यावरच गोळ्या झाडल्याचं या महिलेने सांगितलं.
दहशतवादी हल्ल्यातून बचावलेल्या या महिलेने केलेल्या वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, कांग्रेस नेते व आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, “कोणीतरी म्हटलं की दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांना मारलं. अरे मुळात यासाठी वेळ असतो का? प्रत्येकाच्या जवळ जाऊन, त्याच्या कानात बोलायला, त्याचा धर्म विचारायला दहशतवादी थांबतात का?” वडेट्टीवारांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला असून ते म्हणाले, “हे अत्यंत मूर्खपणाचं वक्तव्य आहे. हे वक्तव्य ऐकून मृतांचे कुटुंबीय त्यांना कधीच माफ करणार नाहीत.”
देवेंद्र फडणवीसांचा विजय वडेट्टीवारांवर संताप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अशा प्रकारची वक्तव्ये करून दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार चालू आहे. पीडित नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांवर सांगितलं होतं. तिथे जे काही घडलं तेच त्यांनी सांगितलं होतं. वडेट्टीवार हे हल्ला झाला त्या ठिकाणी, त्या वेळी उपस्थित नव्हते. मात्र, इथे बसून अशी वक्तव्ये करून मृतांच्या नातेवाईकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला जात आहेत. या कृतीला मुर्खपणा म्हणावं की आणखी काय? माझ्याकडे त्यावर बोलायला शब्द नाहीत.”
ही शत्रूला प्रोत्साहन देणारी वक्तव्ये आहेत : फडणवीस
फडणवीस म्हणाले, “वडेट्टीवारांचं वक्तव्य खूपच असंवेदशील व मूर्खपणाचं आहे. जे लोक तिथे मारले गेले, ज्यांची हत्या झाली, त्यांचे नातेवाईक तिथे होते. त्या नातेवाईकांनी व तिथे उपस्थित लोकांनी केलेली वक्तव्ये खोटी ठरवण्यापेक्षा मोठी असंवेदनशीलता काय असू शकते? दहशतवादी हल्ल्यात आम्ही आमचे बंधू गमावले आहेत, ते व त्यांचे कुटुंबीय अशा लोकांना कधीच माफ करणार नाहीत. कारण हे वक्तव्य खूपच मूर्खपणाचं आहे. ही आपल्या शत्रूंना प्रोत्साहन देणारी वक्तव्ये आहेत.”