“महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत अचानक औरंग्याच्या अवलादी कुठून पैदा झाल्या”, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. या विधानावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये बराच वाद झाल्याचं पाहायला मिळालं. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी या विधानावरून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप चालू असताना देवेंद्र फडणवीसांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. एएनआयच्या पॉडकास्टमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीसांनी या वक्तव्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

“अचानक ओरंगजेबाच्या एवढ्या अवलादी कोठून पैदा झाल्या याचा शोध घ्यावा लागेल, जाणूनबुजून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काहींचे प्रयत्न सुरू आहेत. हे कोण करीत आहे तपासून बघावे लागेल आणि कोणीही कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल” असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर टीका करताना ओवैसींनी फडणवीस मुस्लिमांना लक्ष्य करत असल्याची टीका केली होती. यासंदर्भात फडणवीसांनी आपली भूमिका मांडली आहे.

“औरंगजेब आपला हिरो नाही”

“आमच्या विकासात औरंगजेब हा अडथळा आहे. अनेकदा माध्यमांमध्ये आमच्या वक्तव्यांचा वेगळा अर्थ काढला जातो. मी म्हणालो होतो की अचानक महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये औरंगजेबाचं स्टेटस लावायला सुरुवात झाली आहे. त्यांचे फोटो लावायला सुरुवात झाली. मोर्चे निघायला सुरुवात झाली आहे. औरंगजेब तर आपला हिरो नाही. भारतीय मुस्लिमांचाही हिरो नाहीत. त्याचे वंशजही इथे नाहीत. ते टर्की मंगोल होते. देशभरात या वंशाची किती कुटुंबं निघतील? त्यामुळे त्यांची काही मुलं वगैरेही नाहीत. त्यामुळे इतक्या वर्षांनंतर अचानक इतके लोक त्याचे स्टेटस ठेवायला कसे लागले?” असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

“अचानक औरंगजेबाच्या औलादी कोठून पैदा झाल्या?” काय म्हणाले फडणवीस?

“त्यामुळेच मी म्हणालो माझ्या मनात हा संशय आहे की औरंगजेबाच्या इतक्या अवलादी कशा जन्माला आल्या? त्याच्या अवलादी तर नाहीयेत. याचा अर्थ असा आहे की हेतुपुरस्सर काही लोक सामाजिक सलोखा बिघडवू इच्छित आहेत. तेच लोक असे फोटो लावत आहेत. कारण भारतीय मुस्लीम आणि राष्ट्रवादी मुस्लिमांचा औरंगजेब हिरो होऊ शकत नाही. यात मी काय चुकीचं बोललो? काहींनी त्यातून फक्त औरंगजेबाच्या अवलादी एवढंच काढून सांगितलं. मी कधीच ते मुस्लिमांबाबत म्हटलं नाही”, असं फडणवीस म्हणाले.

“सरकार बदललं आणि हे सगळं घडायला लागलं”

“महाराष्ट्रात आम्ही हे कसं सहन करणार? आम्ही त्याच्याशी लढलो आहोत. लाखो हिंदूंना त्यानं मारलं आहे. देशभरातली मंदिरं तोडली. छत्रपती संभाजी महाराजांना त्यानी ११ दिवस हालहाल करून मारलं. एकाच गोष्टीसाठी की त्यांनी धर्म बदलावा. त्यांनी नाही बदलला धर्म. अशा औरंगजेबाचे पोस्टर जर कुणी लावत असेल, तर कसं सहन केलं जाईल? हे ठरवून केलं जातंय. दरवर्षी हे घडतंय का? असं नाही झालं. सरकार बदललं आणि हे अचानक घडायला लागलं”, असा दावाही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis ani podcast speaks on aurangjeb statement pmw
Show comments