शिंदे-भाजपा सरकारचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारकडून ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजना जाहीर करण्यात आली आहे. तसेच, अन्यही योजनांची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
“अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प ‘पंचामृत’ ध्येयावर आधारीत आहे. शेतकऱ्यांना केवळ १ रूपयांत पीकविमा देण्यात येणार आहे. यासाठी ३ हजार ३१२ कोटी रूपयांचा भार सरकार उचलणार आहे,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा, दरवर्षी मिळणार ‘इतके’ हजार रुपये
“शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होण्यासाठी आगामी तीन वर्षात ३० टक्के वीज वाहिन्यांचे सौरउर्जेत रुपांतर करण्यात येणार आहे. याचा सुमारे ९.५० लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. पंतप्रधान कुसूम योजनेतून पुढील वर्षात दीड लाख शेतकऱ्यांना कृषीपंप देण्यात येतील. प्रलंबित ८६ हजार कृषी पंपधारकांना तात्काळ वीज जोडण्या देण्यात येणार आहे,” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.