Devendra Fadnavis in Agra: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. बुधवारी सकाळी शिवनेरी किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. संध्याकाळी उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमालाही मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात केलेल्या भाषणात देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या एका विधानाची सध्या चर्चा चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाविषयी त्यांनी केलेलं हे विधान आता व्हायरल होत आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने आग्रा येथे उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात देवेंद्र फडवीसांनाही आमंत्रित केलं होतं. या कार्यक्रमात आपल्या भाषणादरम्यान देवेंद्र फडणवीसांनी शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा इतिहास सांगितला. औरंगजेबासमोर महाराजांना उभं करण्यात आलं तेव्हा छत्रपतींनी औरंगजेबाला करारीपणे सुनावल्याचा प्रसंगही त्यांनी सांगितला. यानंतर आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक बांधण्याचा उल्लेख देवेंद्र फडणवीसांनी केला.

“मिर्झा राजे जयसिंग यांचा मुलगा रामसिंगच्या कोठीवर छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवण्यात आलं. तीच रामसिंगची कोठी म्हणजे मीना बझार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे. योगी आदित्यनाथ यांनी तिथल्या मुघल म्युझियमला शिवाजी म्युझियममध्ये रुपांतरित केलं. पण मला विश्वास आहे की इथे शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक बनेल. एक याचक म्हणून मी योगी आदित्यनाथ यांना प्रार्थना करतो की आम्हाला परवानगी द्या, महाराष्ट्र सरकार हे म्युझियम ताब्यात घेईल आणि तिथे शिवाजी महाराजांचं एक भव्य स्मारक तयार करेल”, असं मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“आईशप्पथ सांगतो, एकदा हे स्मारक तयार झालं तर तुमच्या ताज महालापेक्षा हे स्मारक बघण्यासाठी जास्त लोक येतील. असं झालं नाही तर माझं नाव बदलून टाका. मी माझं नाव देवेंद्र फडणवीस सांगणार नाही”, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

“शिवाजी महाराज स्वाभिमानाने आग्र्यात राहिले होते”

“मी योगींशी बोलेन, त्यांना निवेदन देईन. पण तुम्हा सर्वांनाही मी विनंती करतो की तुम्हीही माझ्या वतीने त्यांच्याशी बोला. आपल्याला ते भव्य स्मारक बनवायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानाने आग्र्यात राहिले होते. इथून निसटून ते पुन्हा स्वराज्यात गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा स्वराज्याला उभारी दिली. हरलेले सगळे २४ किल्ले शिवाजी महाराजांनी पुन्हा जिंकून घेतले आणि ते छत्रपती बनले. औरंगजेब काहीही करू शकला नाही. ही ताकद शिवाजी महाराजांची होती”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची माहिती भाषणात दिली.

“मी उत्तर प्रदेश सरकारला विनंती केली आहे. मीना बझारचं जे घर आहे, तिथे स्मारक तयार करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने आम्हाला ते द्यावं, त्याचा यापुढेही मी पाठपुरावा करणार आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.

Story img Loader