Maharashtra Latest Political News Updates: गेल्या काही महिन्यांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून मोठी चर्चा पाहायला मिळत होती. या मतदारसंघातून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीला भारतीय जनता पक्षाच्याच स्थानिक पदाधिकारी व नेत्यांकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी महायुतीकडून नेमका ककाय निर्णय होणार? यावर तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे.
कल्याणमधून श्रीकांत शिंदेंनाच उमेदवारी
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नागपूरमध्ये एका कार्यक्रमात भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर फडणवीस माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना कल्याणच्या उमेदवारीबाबत विचारणा केली असता त्यांनी श्रीकांत शिंदेच महायुतीचे उमेदवार असतील, हे स्पष्ट केलं.
“भाजपाकडून श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीला कोणताही विरोध नाही. श्रीकांत शिंदे कल्याणमधून महायुतीचे उमेदवार असतील. भाजपा त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहील. पूर्ण ताकदीने आणि गेल्यावेळेपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदेंना कल्याणमधून आम्ही निवडून आणू. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं, रासपा ही युती त्यांना निवडून आणेल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे महायुतीचा कल्याणमधील तिढा संपल्याचं स्पष्ट झालं आहे.
कल्याणमध्ये दुहेरी लढत
श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता कल्याणमध्ये दुहेरी लढत पाहायला मिळणार आहे. ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाच्या अंतर्गत विरोधामुळे महायुतीच्या उमेदवाराबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेमुळे आता कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर राणे असा थेट सामना पाहायला मिळणार आहे.
ठाण्यात महायुतीतील तिढा संपला? दीपक केसरकरांचं सूचक विधान, म्हणाले, “एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात…”
गणपत गायकवाड यांची भूमिका काय?
श्रीकांत शिंदे यांच्या नावाला भाजपाचे स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर आता श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गणपत गायकवाड किंवा त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नेमकी भूमिका काय असेल? याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरच्या एका पोलीस स्थानकात गोळीबार केल्याप्रकरणी गणपत गायकवाड यांना अटक झाली होती. या प्रकरणाची महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चाही पाहायला मिळाली होती.