Devendra Fadnavis महाराष्ट्राच्या राजकारणातले दोन महत्त्वाचे नेते म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस. २०१४ आणि त्याआधीपासून हे दोन नेते एकत्र होते. २०१९ हे वर्ष उजाडलं आणि मग या दोन नेत्यांमधलं वैरही महाराष्ट्राने पाहिलं. आता २०२५ मध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. उद्धव ठाकरेंशी युती होईल का? या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी दिलं आहे.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा संघर्ष २०१९ पासून

२०१९ मध्ये शिवसेना आणि भाजपा यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. भाजपाला १०५ जागा मिळाल्या. तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. जनमताचा कौल हा महायुतीलाच होता. मात्र अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेण्यावरुन दोन्ही पक्ष वेगळे झाले. त्यानंतर अडीच वर्षे भाजपा सर्वात मोठा पक्ष असूनही विरोधी पक्षात होता आणि उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये बंड केलं. ज्यानंतर महाविकास आघाडी सरकार पडलं. अडीच वर्षे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते. अजित पवारही त्यांच्यासह सत्तेत सहभागी झाले. महाविकास आघाडी कायम राहिली आणि उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीसांवर ( Devendra Fadnavis ) टीकाही होत राहिली.

२०२४ मध्ये महायुतीला अभूतपूर्व जागा

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला २३७ जागा मिळाल्या. एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपा असे तीन पक्ष महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या भेटी वाढल्या आहेत. उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीच्या आधी पुन्हा भाजपासह येतील का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबत आता देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरेंशी पुन्हा युती होईल का?

देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंशी पुन्हा युती करणार का? हा प्रश्न एबीपी माझाच्या माझा व्हिजन या कार्यक्रमात विचारण्यात आला. ज्यावर त्यांनी तातडीने उत्तर देत नाही असं म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह युती होणार नाही असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी नाही हे उत्तर देताच उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेल्या पाच वर्षांत उद्धव ठाकरेंशी माझे संबंध राहिलेले नाहीत. कारण त्यांनीच ते संबंध तोडून टाकले. आमच्यात मारामारी नाही समोर आलो तर आम्ही एकमेकांशी बोलतो. पण उद्धव ठाकरेंनी सगळे संबंध तोडून टाकले असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे.