Devendra Fadnavis संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद हे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही उमटले. त्यानंतर सातत्याने एक नाव चर्चेत येत होतं ते नाव होतं वाल्मिक कराड. वाल्मिक कराड आज पुणे सीआयडी कार्यालयात शरण आले. त्यानंतर या प्रकणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. माध्यमांशी बोलत असताना फडणवीस म्हणाले, “संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्येक आरोपीवर कडक कारवाई करण्यात येईल, हे मी पहिल्या दिवसांपासून सांगत आलो आहे. कुणालाही अशाप्रकारची हिंसा करण्याचा अधिकार नाही. सर्व दोषी जोपर्यंत फासावर लटकत नाहीत, तोपर्यंतची सर्व कारवाई पोलीस करतील.” यावेळी त्यांना धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याविषयीही प्रश्न विचारला गेला त्याचंही उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
वाल्मिक कराड यांनी व्हिडीओ पोस्ट करत काय म्हटलं आहे?
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे आता पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले आहेत. शरण येण्यापूर्वी त्यांनी स्वतःचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय द्वेषापोटी माझ्याविरोधात आरोप केले जात असून जर पोलिस तपासात मी दोषी आढळलो तर जी शिक्षा होईल, ती भोगण्यासाठी मी तयार असल्याचे ते म्हणाले आहेत. वाल्मिक कराड शरण आल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत भाष्य केलं. विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आहे त्याबाबतही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.
हे पण वाचा- Walmik Karad : “वाल्मिक कराड शरण आला, आधी पुण्यात….”; सीआयडी अधिकारी सारंग आव्हाड यांनी काय सांगितलं?
मुख्यमंत्री म्हणाले गुंडांचे राज्य चालू देणार नाही
“गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही. कुणालाही अशाप्रकारे हिंसा करता येणार नाही, खंडणी मागता येणार नाही. त्या अनुषंगाने आम्ही तपासाला गती दिली असून त्यामुळेच वाल्मिक कराड यांना शरणागती पत्करावी लागली. आता हत्येतील फरार आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके कामाला लागली आहेत. कुठलाही आरोपी आम्ही सोडणार नाही. सर्वांना शोधून काढले जाईल.”
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत काय म्हणाल देवेंद्र फडणवीस?
कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जाते आहे. त्याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला या प्रकरणातील राजकारणात जायचे नाही. मी आधीपासून सांगत आलो आहे की, जे पुरावे समोर येतील त्यानुसार कारवाई केली जाईल. माझ्याकरिता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे हे महत्त्वाचे आहे. काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचे आहे. त्यांना त्यांचे राजकारण लखलाभ. मला कुठल्याही राजकारणात जायचे नाही. त्यांनी त्यांचे राजकारण करत राहावं. आमची भूमिका स्पष्ट आहे ती म्हणजे स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देणं. तो आम्ही मिळवून देणारच. “