Devendra Fadnavis : विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. २० नोव्हेंबरला राज्यात महाराष्ट्र विधानसभेसाठीची निवडणूक पार पडणार आहे आणि त्यानंतर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोहोंनी निवडणूक जिंकण्याचा दावा केला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी तर आमच्या १८० किंवा त्याहून जास्त जागा आल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका असंही म्हटलं आहे. निवडणूक असल्याने नेत्यांच्या मुलाखतीही सुरु आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी देवाभाऊ हे नाव कसं आलं? त्याबद्दल माहिती दिली आहे. राज्यात महायुतीचं सरकार येईल असाही दावा केला आहे. तर ब्राह्मण असणं राजकीयदृष्ट्या अडचणीचं ठरतंय का? या प्रश्नाचंही सडेतोड उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवाभाऊ हे नाव कसं समोर आलं?

देवाभाऊ म्हणून चर्चेत आणण्याची गरज का पडली असं विचारलं असता फडणवीस म्हणाले, देवाभाऊ हे माझं नाव मागच्या आठ ते दहा वर्षांपासून आहे. हे नाव इंटरनेट कम्युनिटीतलं आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो होतो तेव्हापासून मला देवाभाऊ असं म्हटलं जातं. आता ते नाव म्हणजेच देवाभाऊ हे आता कार्यकर्तेही म्हणत आहेत. माझं नाव देवाभाऊ असं का करत आहात? असं काही मी कुणाला रोखलं नाही. कारण कुठलाही नेता म्हटला की कार्यकर्ते आणि जनता हा त्याचा परिवार असतो. त्यामुळे ज्या गोष्टीने भावनिक नातं प्रस्थापित होतं त्या गोष्टी चांगल्या असतात. देवेनभाऊ म्हणायचे त्याचं देवाभाऊ झालं इतकंच तसंच ते मलाही आवडतं असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- Devendra Fadnavis : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमचं धोरण…”

लाडकी बहीण योजना आणली तेव्हा..

आम्ही लाडकी बहीण योजना आणली तेव्हा काँग्रेसचे लोक म्हणाले पैसे मिळणार नाही. तसंच त्यांचे काही लोक कोर्टात गेले. मग कोर्टाने नकार दिला. आता ते लोक म्हणतात आम्ही यापेक्षा जास्त पैसे देऊ. हा दुटप्पीपणा आहे. आम्ही लाडकी बहीण योजनेची घोषणा बजेटमध्ये केली आहे. ऑफ बजेट तरतूद कुठलीही नाही असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीचा अपवाद सोडला तर मागच्या २० ते २५ वर्षांत आमचा स्ट्राईक रेट चांगला असतो. लोकसभेत संविधानाचा फेक नरेटिव्ह तयार केला गेला. तर आठ ते दहा जागा या व्होट जिहादमध्ये गेल्या.

आमची लढाई मुख्यमंत्रिपदासाठी नाहीच, आम्ही..

मी तुम्हाला संख्या सांगत नाही पण स्ट्राईक रेट आमचा हायेस्ट असेल. आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी लढत नाही. महायुतीचं सरकार पुन्हा आलं पाहिजे हे आमचं धोरण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवत आहोत. आमच्याकडे एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष, अजित पवार त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आमचं संसदीय मंडळ हे एकत्र बसतील आणि मुख्यमंत्री कोण ते ठरेल. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महायुतीला आत्ताच्याच कॉम्बिनेशनमध्ये पूर्ण बहुमत मिळेल. असंही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.

ब्राह्मण असल्याचा राजकीय तोटा झाला आहे असं खरंच वाटतं का?

२०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांना जात चिकटली. ब्राह्मण आहेत म्हणून ते कसे योग्य नाहीत हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्याबद्दल तुम्हालाही तसंच वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लोकांच्या मनात जात नाही. जात ही नेत्यांच्या मनात असते. लोकांच्या मनात जात असती तर महाराष्ट्राच्या इतिहासात दुसऱ्यांदा शंभरहून जास्त जागा आल्या नसत्या. जनता जातीकडे बघत नाही ती कामाकडे पाहते. जात नेत्यांच्या मनात असते. आपल्या राजकीय स्वार्थासाठी जात जिवंत ठेवली पाहिजे असा राजकारण्यांचा भर असतो. काही काळ, काही वर्षे हे चालेल. जात आधारित राजकारणाचा काळ आहे. हा काळही निघून जाईल.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis answer on is being a brahmin politically difficult what did he say scj