काँग्रेस नेते राहुल गांधींनी सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचं पत्र दाखवत त्या पत्राच्या ओळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही वाचण्यास सांगितलं. यानंतर आता फडणवीसांना ट्वीट करत राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलंय. यात देवेंद्र फडणवीसांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत अनेक नेत्यांचा उल्लेख करत “अरे भाई आखिर कहना क्या चाहते हो?” असा प्रश्न विचारला.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “राहुल गांधींनी काल मला एका पत्राच्या शेवटच्या ओळी वाचण्यास सांगितलं होतं. आज मी त्यांना काही कागदपत्रे वाचून दाखवू इच्छितो. आपल्या सर्वांचे आदरणीय महात्मा गांधींचं हे पत्र तुम्ही वाचलं का? या पत्रात तुम्ही मला वाचायला सांगितल्या तशाच शेवटच्या ओळी आहेत का?”
“भारताच्या माजी पंतप्रधान आणि तुमचा आजी इंदिरा गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी काय म्हटलं होतं तेही वाचा. त्या वीर सावरकरांना स्वातंत्र्याच्या आंदोलनातील आधारस्तंभ आणि कायम लक्षात राहणारा भारताचा सुपुत्र म्हणत आहेत,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं विशेष स्थान निर्माण केलेल्या शरद पवारांनी सावरकरांविषयी काय म्हटलं आहे हेही वाचा. याच पत्रात ते दोन जन्मठेपेच्या शिक्षांचा उल्लेख करतात.”
हेही वाचा : “तुम्हाला बॉम्बने…” राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी, मिठाईच्या दुकानात मिळालं पत्र
“काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव म्हणाले होते की, स्वातंत्र्यवीर सावरकर एक प्रखर राष्ट्रवादी होते. सामाजिक सुधारणांसाठी त्यांची कटिबद्धता, युवा पीढिला शिकवण देणारी त्यांची ऊर्जा अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी लिहिलं आहे. वाचा,” असं म्हणत फडणवीसांना राहुल गांधींना वाचण्याचा सल्ला दिला.