Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचंड विजय झाला आहे. महायुतीला २३० हून अधिक जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीला मिळून ४९ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पराभवाचं विश्लेषण करताना एक गणित मांडलं. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनीही त्यांना एक पोस्ट करत लगेच उत्तर दिलं. तसंच लोकसभेतल्या पराभवाचं एक गणित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनीही मांडलं आणि शरद पवारांनी जनतेची दिशाभूल करु नये असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

पराभवाचे विश्लेषण करताना शरद पवार म्हणाले, “महाविकास आघाडी यापुढील काळातही एकत्रित निवडणुकांना सामोरे जाणार आहे. पराभव झाला म्हणून नाउमेद व्हायचे नसते. निवडणुकीला काही पर्याय नसतो. मी आयुष्यात १४ वेळा निवडणूक लढलो, मला कधीही पराभव पाहावा लागला नाही. पण यावेळेला राज्यात आम्हाला पराभव पाहायला मिळाला. जरी पराभव आला तरी चिंता करायची नसते. लोकांमध्ये जावे लागते आणि लोक चिंताग्रस्त आहेत, असे आम्हाला दिसते. लोकांमध्ये उत्साह दिसत नाही. निवडणूक झाल्यानंतर एक उत्साह दिसतो, तो मात्र यावेळेला दिसत नाही.”

शरद पवारांनी काय गणित मांडलं?

शरद पवार पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाला ८० लाख मते पडली आणि त्यांचे फक्त १६ आमदार निवडून आले. तर शिवसेना शिंदे गटाला ७९ लाख मते मिळाली आहेत, तर त्यांचे ५७ आमदार निवडून आले आहेत. म्हणजे एक लाख कमी मतदान मिळूनही जवळपास ४१ आमदार अधिक निवडून आले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची मते ७२ लाख आहेत. पण आमदार निवडून आले फक्त १० आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ५८ लाख एवढे मतदान मिळाले, पण त्यांचे ४१ आमदार निवडून आले आहेत.”

हे पण वाचा- Sanjay Raut-Raj Thackeray: देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंबाबत मांडलेल्या भूमिकेवर राऊतांची टीका

देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर काय?

शरद पवार साहेब,
@PawarSpeaks

आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका.
जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? चला २०२४ च्या लोकसभेत काय झाले ते पाहू, भाजपाला मतं १,४९,१३,९१४ आणि जागा ९, पण काँग्रेसला मतं ९६,४१,८५६ आणि जागा १३. शिवसेनेला ७३,७७,६७४ मतं आणि ७ जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला ५८,५१,१६६ मतं आणि ८ जागा. २०१९ च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला ८७,९२,२३७ मतं होती आणि १ जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला ८३,८७,३६३ मतं होती आणि जागा ४ आल्या. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे.

अशी पोस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी केली असून त्यांनी शरद पवारांच्या गणिताला गणितानेच उत्तर दिलं आहे. तसंच किमान शरद पवारांनी जनतेची दिशाभूल करु नये अशी विनंती केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis answer to shard pawar shares the number of bjp votes in loksabha and ask this question scj