आज रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षातर्फे अमरावतीत दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हनुमान चालिसा प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांना नाव न घेता खोचक टोला लगावला. आता आपले सरकार आले असून आता कोणालाही हनुमान चालिसा म्हणण्यावरून कारागृहात जावे लागणार नाही, असे ते म्हणाले. तसेच १४ दिवस कारागृहात राहणाऱ्या राणा दाम्पत्याचा मला अभिमान आहे, असे म्हणत त्यांनी राणा दाम्पत्याचे कौतुकही केले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“गेले दोन वर्ष आपण बंदीस्त होतो. मात्र, आता आपलं सरकार आलं तर कसं खुलं खुलं वाटतं आहे. आता दहिहंडीसह, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सर्व सण जोरात साजरे होतील. आता कोणालाही हनुमान चालिसा म्हणण्यावरून कारागृहात जावे लागणार नाही. मी रवी राणा आणि नवनीत राणा याचं अभिनंदन करतो, कारण जेव्हा महाराष्ट्रात हनुमान चालिसा म्हणणे कठीण झाले होते. तेव्हा हे दोघे मैदानात आले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला जेलमध्ये टाका, पण आम्ही हनुमान चालिसा म्हटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे दोघांनाही १४ दिवस कारागृहात जावे लागले. म्हणूनच मला दोघांचाही अभिमान वाटतो.”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – “सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हीच मोठी समस्या”; नितीन गडकरींचा मोदी सरकारला घरचा आहेर

“आज या दहीहंडीच्या निमित्ताने आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे. आज नवनीत राणा आणि रवी राणा यांनी अमरावतीसाठी जे स्वप्न बघितलं आहे. ते आम्ही सर्व मिळून पूर्ण करू. आम्ही दोघांच्याही पाठिशी आहे. रवी राणा आणि नवनीत राणा हे खऱ्या अर्थाने गरिबांचे कैवारी आहेत”, असेही ते म्हणाले.

Story img Loader