कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. संपूर्ण देशाचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रही या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहे. तसेच कर्नाटकमधल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातल्या नेत्यांची मोठी फळी कर्नाटकात दाखल झाली आहे. देवेंद्र फडणवीसांसह भाजपा नेते कर्नाटकात भाजपाचा प्रचार करत आहेत. तर मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे देखील कर्नाटकात भाजपाचा प्रचार करत आहेत. काँग्रेसचेही राज्यातले काही नेते कर्नाटकात प्रचार करताना दिसत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसनेही कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ९ उमेदवार दिले आहेत. निपाणीत राष्ट्रवादी काँग्रेसने उत्तम पाटील यांना विधानसभेचं तिकीट दिलं आहे. दरम्यान, भाजपा नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज निपाणी येथे जाऊन भाजपा उमेदवाराचा प्रचार केला. भाजपा उमेदवारासाठी सभादेखील घेतली. या सभेत फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा एक पक्ष आहे. या पक्षाने आता इथे अख्ख्या कर्नाटकमध्ये त्यांचा एक उमेदवार दिला आहे. तो उमेदवार इथे (निपाणी) आहे. हा पक्ष काय डोंबलं करणार आहे इथे येऊन? खरं म्हणजे ही यांची मिली जुली कुस्ती आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिली जुली कुस्ती सुरू आहे.” यावेळी फडणवीस यांनी मतदारांना आवाहन केलं, ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पॅक करून पाठवून द्या, आम्ही पाहून घेऊ.”
दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार म्हणाले, “दिल्ली, पंजाब, उत्तराखंड, बंगालमध्ये भाजपाची सत्ता नाही. देशाचा नकाशा पाहिल्यास लक्षात येईल की, अनेक राज्यात भाजपा सत्तेवर नाही. इतर राज्यात नॉन भाजपा सरकार आहे. त्याचबरोबर आता कर्नाटकमधील स्थानिक लोक भाजपावर नाराज आहेत, त्यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता येणार असं दिसतंय.”