राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी शरद पवार आणि गौतम अदाणी यांचा फोटो ट्विट करत टीका केली. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

शरद पवार काय म्हणाले?

‘एनडीटिव्ही इंडिया’शी बोलताना शरद पवारांनी म्हटलं, “आम्ही हिंडेनबर्ग कंपनीचे कधी नावही ऐकले नव्हते. त्या कंपनीच्या अहवालात अदाणींना लक्ष्य करण्यात आल्याचे दिसते. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीनंतर आता संयुक्त संसदीय समितीच्या नियुक्तीची आवश्यकता नाही. एका परदेशी कंपनीच्या अहवालाने देशात खळबळ उडाली. अशाप्रकारची वक्तव्ये यापूर्वीही काही लोकांनी केली होती. काही दिवस संसदेत यावरून गदारोळही झाला होता.”

हेही वाचा : “…तर अशाने देश गुलामच होईल”, संजय राऊतांचा ‘बुवाबाजी’वरून भाजपावर हल्लाबोल

यानंतर अलका लांबा यांनी शरद पवार आणि गौतम अदाणी यांचा फोटो ट्विट केला. त्यावर लिहिले की, “भित्रे, स्वार्थी लोक स्वत:च्या हितासाठी हुकूमशाही सत्ताधीशांचे गुणगान गात आहेत. पण, राहुल गांधी एकटे देशातील जनतेसाठी लढाई लढत आहेत. तसेच, भांडवलदार चोर आणि चोरांना संरक्षण देणाऱ्या चौकीदाराशीही,” असं अलका लांबांनी म्हटलं.

हेही वाचा : काँग्रेसमधून निलंबन, राष्ट्रवादीत प्रवेश करणार? आशिष देशमुखांनी दिले स्पष्टीकरण; म्हणाले, “मी…”

याच ट्विटवरून देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले आहे. “राजकारण होत आणि जाते. पण, काँग्रेसच्या एका नेत्याने त्यांचा ३५ वर्षातील मित्रपक्ष आणि भारतातील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेत्यांपैकी एक आणि महाराष्ट्राचे ४ वेळा मुख्यमंत्री असणाऱ्यांबद्दल केलेले ट्विट आश्चर्यकारक आहे. भारतातील राजकीय संस्कृतीत राहुल गांधी घाणेरडे राजकारण करत आहेत,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Story img Loader