Devendra Fadnvis Bags Checked Video : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून राज्यभर जोरदार प्रचार केला जात आहे. यासाठी नेत्यांचे दौरे सुरू आहेत. अशाच दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या बॅगा दोनदा तपासण्यात आल्या, यावरून सध्या राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. लातूरच्या औसामधील अशा तपासणीचा स्वत: उद्धव ठाकरेंनी काढलेला व्हिडीओही व्हायरल झाला होता.
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या बॅगांच्या तपासणीचा व्हिडीओ पोस्ट करत सत्ताधारी पक्षांवर तसेच निवडणूक आयोगावर टीका केली होती. यानंतर आता भाजपाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगा तपासल्या जात असल्याचा व्हिडीओ शेअर करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर भाजपाकडून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
काय आहे भाजपाने शेअर केलेल्या Video मध्ये?
या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगांची तपासणी होताना दिसत आहे. यवतमाळ आणि कोल्हापूर येथे फडणवीस यांच्या बॅगांची तपासणी झाल्याचे भाजपाकडून सांगण्यात आले आहे. एक्सवर शेअर केलेला व्हिडीओ ५ नोव्हेंबरच्या प्रसंगाचा असल्याचं भाजपाकडून पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. यासोबतच भाजपाने नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते! हा व्हिडिओ पहा, ७ नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यात आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगांची तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हीडिओ काढला, ना कोणती आगपाखड केली. तत्पूर्वी, ५ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगांची तपासणी झाली.”
“केवळ दाखवण्यासाठी संविधान हाती घेऊन चालत नाही, तर संवैधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात. संविधानाचे भान प्रत्येकाला असलेच पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे”, असेही भाजपने म्हटले आहे.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
लातूर जिल्ह्यातल्या औसा येथील सभेत उद्धव ठाकरेंनी बॅग तपासणीचा मुद्दा उपस्थित केला. “माझी बॅग तपासली, त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. मात्र, सर्वांना समान न्याय हवा. मोदी-शहांची पण बॅग तपासली गेली पाहिजे”, अशी मागणी ठाकरे यांनी केली. “लोकशाहीमध्ये समान न्याय हवा, पण दुर्दैवाने एकाच पक्षाच्या लोकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे”, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
बार्शी येथे आयोजित सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांवर हल्लाबोल केला. “एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला माझी बॅग तपासण्याचे आदेश दिले आहेत. मी तर म्हणतो की मिंधेंनी रोज माझी बॅग घेऊन माझ्याबरोबर फिरावं. फक्त त्यांनी एक करावं. जसा माझा पक्ष चोरला तसं त्यांनी बॅगमधून माझे कपडे चोरू नयेत. शेवटी चोर तो चोर असतो, एकदा चोरीची सवय लागली, की आयुष्य चोरीतच जातं”, असे ठाकरे म्हणाले.