राज्यात ऐन उन्हाळ्यात शेतीला पाण्याची गरज असताना वीज पुरवठा खंडीत असल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. पाण्याविना पीकं जळल्याने अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतीसाठीच्या वीजपुरवठ्याबाबत मोठी घोषणा केली. तसेच आता शेतीसाठी दिवसा १२ तास अखंडीत वीज देऊ, असं जाहीर केलं. ते गुरुवारी (२५ मे) सोलापूरमध्ये भाजपा सोलापूर शहर व ग्रामीण जिल्हा संकल्प महाविजय कार्यकर्ता संमेलनात बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आता मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी ही क्रांतीकारी योजना आणली आहे. त्यात आपण कृषीवाहिन्या सोलरवर कार्यन्वित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा १२ तास अखंडीत वीज देणार आहोत.”
“…तर शेतकऱ्यांची खासगी पडीक जमीन ३० वर्षांसाठी भाडेतत्वावर घेऊ”
“यातील दुसरं क्रांतीकारी पाऊल म्हणजे सोलर फीडर तयार करण्यासाठी सरकारी जमीन नसेल, तर आम्ही शेतकऱ्यांची खासगी पडीक जमीन ३० वर्षांसाठी भाडेतत्वावर घेऊ,” असं देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं.
व्हिडीओ पाहा :
“मोदींनी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे राजकारण मोडीत काढलं”
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे राजकारण मोडीत काढण्याचं काम केलं. सामाजिक-आर्थिक परिवर्तनाची लढाई देशाचा पंतप्रधान म्हणून लढली जाऊ शकते आणि सर्वसामान्यांच्या जीवनात परिणामकारक बदल घडवला जाऊ शकतो हे गेल्या ९ वर्षात मोदींनी दाखवून दिलं. त्यामुळे ज्यांची दुकानं बंद होत आहेत ते एकत्र येत आहेत आणि मोदींवर टीका करत आहेत.”
हेही वाचा : “शिंदे-फडणवीसांनी आम्हाला शब्द दिला आहे की…”, प्रताप सरनाईकांचं मोठं विधान
“हे कितीही एकत्र आले तरी त्याचा मोदींवर काहीही परिणाम होणार नाही”
“हे कितीही एकत्र आले तरी त्याचा मोदींवर काहीही परिणाम होणार नाही. यांनी २०१९ मध्येही हे करून पाहिलं. वेगवेगळ्या राज्यांमध्येही हे करून पाहिलं. मात्र, जनता मोदींच्या पाठिशी, भाजपाच्या पाठिशी आहे. त्यामुळे लोकसभा असो की विधानसभा असो भाजपालाच पाठिंबा मिळेल,” असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.