Devendra Fadnavis Cabinet interesting facts : विधानसभा निवडणूक निकालानंतर तीन आठवड्यांनी राज्य मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार रविवारी (१५ डिसेंबर) झाला. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात विविध जातीजमातीची समीकरण साधताना तिन्ही पक्षांनी ज्येष्ठ नेत्यांना धक्का दिला. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काही ज्येष्ठ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला असून ३९ जणांपैकी २० नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली.नागपूरमधील राजभवनाच्या प्रांगणात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांचा आधीच शपथविधी झाला होता. हे तीन व नवे ३९ असे एकत्रित मंत्रिमंडळाचे आकारमान ४२ इतके झाले आहे. कायद्यानुसार ४३ मंत्रिपदांची तरतूद असल्याने एक मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आले आहे. हे मंत्रिपद कोणासाठी रिक्त ठेवण्यात आले याची नंतर कुजबुज सुरू झाली.
फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मराठा, ओबीसी, आदिवासी, धनगर, अनुसूचित जाती, अल्पसंख्याक, बिगर मराठी अशा सर्व जातीजमातींचा समतोल राखण्यात आला आहे. याशिवाय विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र असा विभागीय समतोल राखण्यात आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, अॅड. आशीष शेलार, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे-पाटील, पंकजा मुंडे, अतुल सावे, शिवसेनेचे उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई तर राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे, नरहरी झिरवळ, आदिती तटकरे, अनिल पाटील आदींना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
हे ही वाचा >> “…त्यांना आम्ही मंत्रिमंडळात स्थान देत नाही”, मोठ्या नेत्यांना डावलण्याबाबत फडणवीसांची रोखठोक भूमिका
फडणवीसांच्या मंत्रिमंडळाबाबतचे २० महत्त्वाचे मुद्दे
- नव्या मंत्रिमंडळात एकूण चार महिला मंत्री आहेत. यामध्ये पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ, आदिती तटकरे, मेघना बोर्डीकर यांचा समावेश आहे.
- रविवारी ३३ कॅबिनेट मंत्र्यांचा व सहा राज्यमंत्र्यांचा शपथिधी झाला
- फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकूण ४२ मंत्री आहेत
- मंत्रिमंडळात भाजपाने नऊ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
- शिवसेनेने सहा, तर राष्ट्रवादी काँग्रेसने पाच नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
- फडणवीसांच्या मंत्रिमंडळात भाजपाचे १७ कॅबिनेट मंत्री व तीन राज्यमंत्री आहेत
- शिवसेनेचे १० कॅबिनेट व दोन राज्यमंत्री आहेत.
- राष्ट्रवादीचे आठ कॅबिनेट व एक राज्यमंत्री आहेत.
- सातारा जिल्ह्याला सर्वाधिक मंत्रीपदं मिळाली आहेत. साताऱ्यात चार कॅबिनेट मंत्री आहेत. शंभूराज देसाई (पाटण), शिवेंद्रराजे भोसले (सातारा), जयकुमार गोरे (माण) व मकरंद पाटील (वाई) यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे.
- पुणे जिल्ह्याला तीन कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद मिळालं आहे.
- नाशिक व जळगाव जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्रीपदं मिळाली आहेत.
- नाशकात दादा भुसे, माणिकराव कोकाटे व नरहरी झिरवाळ यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे.
- जळगावात गुलाबराव पाटील, गिरीश महाजन व संजय सावकारे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे.
- रत्नागिरी जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत, तर एक राज्यमंत्री मिळाले आहेत. उदय सामंत व नितेश राणे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे, तर योगेश कदम यांना राज्यमंत्रीपद मिळालं आहे.
- रायगड जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. यामध्ये आदिती तटकरे व भरत गोगावले यांचा समावेश आहे.
- कोल्हापूर जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ व प्रकाश आबिटकर यांचा समावेश आहे.
- ठाणे जिल्ह्याला दोन मंत्री लाभले आहेत. यामध्ये एकनाथ शिंदे व प्रताप सरनाक यांचा समावेश आहे.
- मुंबईला मंगलप्रभात लोढा व आशिष शेलार यांच्या रुपाने दोन कॅबिनेट मंत्री लाभले आहेत.
- राज्यातील १९ जिल्ह्यांना किमान एक तरी मंत्री लाभला आहे.
- १७ जिल्ह्यांना एकही मंत्रीपद मिळालेलं नाही.