Devendra Fadnavis Cabinet Chhagan Bhujbal Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी काही तासांवर आला आहे. आज (१५ डिसेंबर) सायंकाळी नागपूर येथे फडणवीसांच्या सरकारमधील नवे मंत्री शपथ घेतील. तीनही पक्षांनी अद्याप संभाव्य मंत्र्यांची नावे जाहीर केलेली नाहीत. मात्र, काही नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांना मंत्रिपदासाठी वरिष्ठांकडून निरोप मिळाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. भाजपाकडून गिरीश महाजन, जयकुमार रावल, माधुरी मिसाळ यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना त्यांना शपथविधीसाठी तयार राहण्याचा निरोप मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. नव्या सरकारमध्ये भाजपाच्या वाट्याला १९ मंत्रिपदे आल्याची चर्चा आहे. तर, शिवसेनेला (शिंदे) १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला ९ मंत्रिपदं मिळणार असल्याचं बोलले जात आहे. सूत्रांच्या हवाल्याने अनेक वृत्तवाहिन्यांकडून ही माहिती जाहीर करण्यात आली असली तरी सरकारमधील किंवा तिन्ही पक्षांमधील कोणत्याही नेत्याने या वृत्ताला दुजोरा दिला नाही. अंतिम यादी सायंकाळी जाहीर होऊ शकते.

फडणवीस सरकारमधील ३९ ते ४१ आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेतील. फडणवीसांच्या या सरकारमध्ये १५ ते २० नवे चेहरे दिसणार आहेत. तर, एकनाथ शिंदेंच्या सरकारमधील काही मंत्र्यांना नव्या सरकारमध्ये संधी दिली जाणार नाही. अनेक मंत्र्यांना शपथविधीसाठी फोन आलेला नसल्याचं वृत्त समोर आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुधीर मुनगंटीवार व रवींद्र चव्हाण हे दोन मोठे नेते फडणवीसांच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत. रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजपा प्रदेशाध्यक्षपद सोपवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, शिवसेनेकडून (शिंदे) दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार या तीन माजी मंत्र्यांना शपथविधीसाठी फोन आलेला नाही.

हे ही वाचा >> फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राचा वरचष्मा? तिन्ही पक्षांकडून सहकार पंढरीला झुकतं माप; साताऱ्यातील चौघांना संधी

फडणवीसांच्या मंत्रिमंडळात भुजबळ नसणार?

राष्ट्रवादी काग्रेस पार्टीमधील (अजित पवार) ज्येष्ठ नेते तथा माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे देखील नव्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत. तसेच, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना देखील शपथविधीसाठी फोन आलेला नसल्याचा दावा अनेक वृत्तवाहिन्यांनी केला आहे. नाशिक जिल्ह्यात महायुतीचे सात आमदार आहेत. त्यापैकी केवळ नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदासाठी फोन आल्याचं सांगितलं जात आहे.

हे ही वाचा >> Maharashtra Cabinet Expansion: अजित पवारांनी भाकरी फिरवली; ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपदासाठी अद्याप फोन नाही, ‘हे’ नेते शपथ घेणार

फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राचा वरचष्मा

मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राचा वरचष्मा पाहायला मिळू शकतो. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर वगळता इतर चारही जिल्ह्यांचे प्रतिनिधी नव्या मंत्रिमंडळात दिसतील. सातारा, सांगली, पुणे व कोल्हापूरमधील अनेक आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळू शकते. पुणे व साताऱ्यातील प्रत्येकी चार व कोल्हापुरातील दोन आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे.

Story img Loader