राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात सध्या राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चालू आहे. सत्ताधारी व विरोधक या दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप केले जात आहेत. विधानपरिषदेत यासंदर्भात चालू असलेल्या चर्चेमध्ये विरोधी पक्षांकडून राज्यातील नोकरभरतीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सरकारी नोकरभरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये पेपरफुटीची अनेक प्रकरणं समोर येत असल्याचा दावा विरोधकांनी केला असता सत्ताधारी पक्षाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यावर उत्तर दिलं. तसेच, आपण चुकीचं सांगत असू तर माझ्याविरोधात हक्कभंग आणा, असं आव्हानच फडणवीसांनी दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात विरोधकांकडून घेण्यात आलेल्या आक्षेपांचा उल्लेख केला. “नोकरभरतीचा विषय इथे मांडला गेला. या सरकारने नोकरभरती पारदर्शीपणे करून नोकरभरतीचा विक्रम केला आहे. आपण ७५ हजार पदं भरण्याची घोषणा केली होती. त्यातल्या ५७ हजार ४५२ लोकांना नियुक्ती आदेश दिले आहेत. १९,८५३ लोकांची परीक्षा वगैरे सगळं झालंय. पुढच्या महिन्याभरात नियुक्ती आदेश त्यांनाही जातील. म्हणजे एकूण ७७ हजार ३०५ लोकांना नोकरी देण्यात आली आहे. हा कोणत्याही सरकारच्या काळातला विक्रम आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“पुढच्या तीन महिन्यात ३१ हजार २०१ पदांच्या नियुक्ती आदेशांचं काम पूर्ण होईल. म्हणजे येत्या तीन महिन्यांच्या काळात १ लाख सरकारी नोकऱ्या देण्याचा विक्रम आमच्या सरकारनं केलाय. आपण ६९ लाख १५ हजार ४७१ विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या. त्यातून ही पदं भरली. हे सगळं होत असताना त्यात पेपरफुटीची एकही घटना घडलेली नाही”, असं फडणवीसांनी नमूद केलं.

पेपरफुटीची एकही घटना नाही, फडणवीसांचा दावा

दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीसांनी महायुती सरकारच्या काळात एकही पेपरफुटीची घटना घडली नसल्याचा दावा केला आहे. “जलसंधारणाच्या परीक्षेत एक विद्यार्थी सापडला ज्याच्या प्रवेश पत्रावर काही आकडे सापडले होते. त्यामुळे आपण ती परीक्षा पेपर फुटला असं समजून रद्द केली. पण पेपर फुटला असता तर त्या विद्यार्थ्याचे १०० पैकी १०० उत्तरं बरोबर यायला हवी होती. पण त्याची ४८ उत्तरं बरोबर आली होती, ५२ चुकली होती. पण तरी आपण ती परीक्षा रद्द केली, एफआयआर केला. याव्यतिरिक्त पेपरफुटीचा एकही एफआयआर नाही”, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिली.

देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या माहितीवर समोरच्या बाकांवरून आक्षेप घेण्यात आला. त्यावर फडणवीसांनी माहिती खरी असल्याचं ठामपणे सांगितलं. “वंजारी साहेब, तुम्ही पेपरच्या बातम्यांवर जाऊ नका. मी अधिकृत सांगतोय. हे खरं नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा. याव्यतिरिक्त ४७ घटना या बोगस उमेदवार बसवला, कॉपी करताना पकडलं अशा आहेत. यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरलेली नाही. काही लोकांनी असा प्रयत्न केला होता. पण नरेटिव्ह तयार करण्यात येतंय की रोज पेपर फुटतायत. पण तसं नाहीये”, असं फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis challenges opposition to bring hakkabhang prastaav pmw