Devendra Fadnavis Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने आज (३१ ऑगस्ट) दुपारी नागपूरच्या रेशीम बाग मैदानात महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ मेळावा आयोजित केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाला संबोधित केलं. फडणवीस म्हणाले, “काही लोक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या शासकीय योजना बंद करू पाहत आहेत. मात्र आम्ही कोणत्याही परिस्थितीत या योजना बंद होऊ देणार नाही”. दरम्यान, लाडकी बहीण योजना आणून आमच्या सरकारने काही चूक केली आहे का? असा प्रश्न फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपण सुरू केलेल्या योजना यापुढेही चालू ठेवायच्या आहेत ना? मुलींना मोफत शिक्षण, शुभमंगल योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना, लेक लाडकी योजना, यांसारख्या इतर योजना आपल्याला चालू ठेवायच्या आहेत ना? कारण काही लोक या योजना बंद व्हाव्यात, यासाठी प्रयत्न करत आहेत”.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “काही लोक म्हणतात, या योजना चालू ठेवू नका, मला या सगळ्याचं खूप दुःख वाटतंय. मला सर्व बहिणींना सांगायचं आहे की राजकारणात वेगवेगळे पक्ष असू शकतात. परंतु, लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यांनी ती योजना रद्द करावी यासाठी याचिका दाखल केली आहे. हे वडपल्लीवार कोण आहेत माहितीय का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस नेते विकास ठाकरे यांचे ते निवडणूक प्रमुख होते. सुनील केदार यांचे राईट हॅन्ड म्हणून ओळखले जातात. वडपल्लीवार यांनी न्यायालयाला सांगितलं की या योजनांवर फार पैसा खर्च होतो. त्यामुळे या योजना बंद करा”.

हे ही वाचा >> बदलापूर-कोलकाता प्रकरणांवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; सरन्यायाधीशांसमोर म्हणाले, “जितक्या लवकर…”

“मला या राखीची आण” : देवेंद्र फडणवीस

फडणवीस म्हणाले, “विरोधक या योजना बंद व्हाव्यात यासाठी न्यायालयात गेले, मात्र बहिणींनो तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मी तुम्हाला आश्वासन देतो की तुमचा हा देवा भाऊ इथे आहे तोवर उच्च न्यायालयात मोठ्यात मोठा वकील उभा करू, मला या राखीची आण आहे, काहीही झालं तरी या योजनांवर स्थगिती येऊ देणार नाही. आम्ही प्रयत्नांची शर्थ करून उच्च न्यायालयात खटला लढू आणि या योजना चालू ठेवू”.