राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली असून, काही नेत्यांकडून राज्यपाल हटाव अशी मागणी देखील करण्यात आली आहे. शिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील राज्यपालांना इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.
माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “ महाराष्ट्राच्या इतिहासात आणि वाटचालीत मराठी माणसाचं कार्य, श्रेय हे सर्वाधिक आहे आणि उद्योगाच्या क्षेत्रात देखील, मराठी माणसाने जी प्रगती केली आहे. आज जगभरात मराठी माणसाचं नाव झालेलं आहे. हे खरंच आहे की विविध समाजांचं योगदान आपल्याला नाकारता येणार नाही. गुजराती, मारवाडी किंवा इतर कोणता समाज असेल, पण महाराष्ट्रच्या जडणघडणीत मराठी माणसापेक्षा मराठी उद्योजक, मराठी साहित्यक, विविध क्षेत्रातील मराठी लोक यांचा सहभाग हा सर्वात जास्त आहे.”
राज्यपालांना घरी पाठावयाचं की तुरुंगात याचा विचार करण्याची वेळ आली आहे – उद्धव ठाकरे
तसेच, “ मला असं वाटतं की एकूणच या संपूर्ण बाबींना जर आपण बघितलं तर, एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर अनेकदा अतिशोयक्ती अलंकार हा वापरला जातो, तशाच प्रकारे राज्यपाल बोलले आहेत. मला विश्वास आहे की त्यांच्याही मनात मराठी माणसाबद्दल श्रद्धा आहे आणि त्यांनाही पूर्णपणे याची जाणीव आहे, की मुंबई किंवा महाराष्ट्राच्या विकासात, या देशाच्या विकासात मराठी माणसाचा सहभाग हा सर्वाधिक आहे.” असं फडणवीसांनी बोलून दाखवलं.
महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी करा – नाना पटोले
याचबरोबर, “ राज्यपाल काय बोलले आहे, त्या संदर्भात राज्यपाल खुलासा करतील. मात्र आम्ही त्या मताशी सहमत नाही, हे मी स्पष्टपणे सांगितलं आहे.” असंही यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.