Devendra Fadnavis On Guardian Ministership : राज्यात तीन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार विजय मिळवत पुन्हा एकदा सत्ता मिळवली. त्यानंतर भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली तर शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले. मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीसाठी बराच वेळ लागला. इतकेच नव्हे तर पालकमंत्रीपदाच्या नियुक्त्या जाहीर झाल्यानंतर महायुतीमध्ये रायगड आणि नाशिकवरून गोंधळ निर्माण झाल्याचेही पाहायला मिळाले. दरम्यान या पालकमंत्रीपदाच्या गोंधळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रत्येकाची इच्छा असते की, आपला पालकमंत्री असावा

आज (४ फेब्रुवारी) ‘लोकसत्ता – वर्षवेध’च्या अंकाच्या प्रकाशनावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वजण पालकमंत्रीपद मिळावे यासाठी का आग्रही असतात असा प्रश्न विचारला होता. याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा प्रमुख असतो. आता काही जिल्हे असे आहेत की, जिथे दोन पक्षांची चांगली ताकद आहे. एखाद्या ठिकाणी तिन्ही पक्षांची चांगली ताकद आहे. त्यामुळे प्रत्येकाची इच्छा असते की, आपला पालकमंत्री असावा, जेणेकरून आपल्या पक्षाला अधिक न्याय देता येईल. त्याचबरोबर तिथल्या आमदारांनाही वाटते की, पालकमंत्री आपल्या पक्षाचा असावा. त्यासंदर्भात आम्ही काही निर्णय केले. पण, त्यातील दोन निर्णय आम्हाला थांबवावे लागले.”

…चर्चा करून मार्ग काढू

पालकमंत्री पदाच्या नियुक्तीनंतर रायगड आणि नाशिकच्या निर्णयांवरून महायुतीमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळाली होती. त्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, “पालकमंत्री पदाबाबत जे दोन निर्णय थांबवले आहेत, त्यावर चर्चा करून मार्ग काढू.”

दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर एका महिन्यानंतर, महायुती सरकारने राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.