मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
भाजप संविधान बदलणार असल्याचा अपप्रचार काँग्रेससह अन्य विरोधक करीत आहेत. मात्र संविधानाचा मूळ गाभा कुणीच बदलू शकत नाही. त्याचे संरक्षण करण्यास भाजप सरकारचे प्राधान्य आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली.
अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. भाजपने दहा वर्षांच्या शासनकाळात अनुसूचित जातींसाठी काँग्रेसपेक्षा जास्त काम केल्याचा दावा करीत या समाजाचा वापर काँग्रेसने केवळ मतांसाठी केल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. काँग्रेसने अनुसूचित समाजापेक्षा त्याच्या नेत्यांना मोठे केले. हे नेते समाजाचे ठेकेदार बनले. त्यामुळे डॉ. आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार काँग्रेसला नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
नागपूर ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आहे. येथील दीक्षाभूमी, चिचोली, ड्रॅगन पॅलेस या ठिकाणी त्यांच्या स्मृती जपण्याचे काम भाजपने केले. अटलजींच्या काळातील सहा वर्षे आणि मोदी सरकारची साडेचार वर्षे अशा दहा वर्षांत भाजपने अनुसूचित जातींसाठी जेवढे काम केले, तेवढे काँग्रेस काळातही झाले नाही. या वेळी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद सोनकर, खासदार दुष्यंत गौतम, कृष्णा राज, रामशंकर कथेरिया, अर्जुदान मेघवाल, राजकुमार बडोले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
‘इंदू मिलची जागा काँग्रेस नेत्यांना हडप करायची होती’
इंदू मिलच्या जागेवर डॉ. आंबेडकरांचे स्मारक उभारण्याची मागणी काँग्रेसच्या काळात करण्यात आली होती, मात्र त्यांनी एक इंचही जागा मिळवून दिली नाही. उलट काँग्रेसच्या काही नेत्यांनी मिलची जागा हडप करण्याचे प्रयत्न केले होते. भाजप सरकारने केंद्र सरकारकडून त्या जमिनीसंदर्भातील सर्व मंजुऱ्या आणल्या आहेत. त्या ठिकाणी २०२० पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
‘भ्रष्टाचार, नकारात्मकता निर्माण करणाऱ्यांची महाआघाडी’
कोलकात्यामध्ये शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने झालेल्या सभेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा विरोधकांवर टीकास्त्र सोडले. ही आघाडी भ्रष्टाचारी व नकारात्मक, अस्थिरता निर्माण करणाऱ्यांची आहे. या पक्षांकडे धनशक्ती आहे तर भाजपच्या पाठीशी जनशक्ती असल्याचे पंतप्रधानांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले. मोदींनी दक्षिण गोवा, कोल्हापूर, हातकणंगले, माढा व सातारा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांशी यावेळी संवाद साधला.