सरकारला मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी ४० दिवसांची वेळ देऊनही निर्णय न झाल्याने मनोज जरांगे पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. आज (२९ ऑक्टोबर) त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती काहिशी खालवली आहे. बोलताना त्यांच्या हातांचा थरकाप होताना दिसला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगेंच्या प्रकृतीवर प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मनोज जरांगे यांच्याबरोबरच्या लोकांनीही त्यांची थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात लक्ष घालत आहेत.”
“त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवला पाहिजे”
“जे काही योग्य निर्णय आहे तो झाला पाहिजे यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्न चालला आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेवला पाहिजे,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
“बाकीची वळवळ करायची नाही”
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी “माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर चर्चा होऊ शकत नाही” असं म्हटलं होतं. यावर मनोज जरांगे-पाटलांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, “चर्चेला यावं, मराठे कुठेही आडवणार नाहीत. मला बोलता येतेय, तोपर्यंत चर्चेला या. नंतर येऊन उपयोग नाही. फक्त एकदाच चर्चेला येणार की नाही, हे सांगा. बाकीची वळवळ करायची नाही.”
हेही वाचा : “गड्यांनो मला माफ करा, मी…”; क्षीण आवाजात मनोज जरांगे यांचं वक्तव्य, म्हणाले…
“सरकारला माणुसकी समजत नाही”
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे-पाटील यांचा हात थरथर कापत होता. ते नेहमीप्रमाणे बोलू शकत नव्हते. “सरकारचं कुठंलही उत्तर नाही अथवा संवाद नाही. ३०-३१ ऑक्टोबरपर्यंत आम्ही वाट पाहू. सरकारला माणुसकी समजत नाही. आम्ही त्यांना उत्तर देऊ,” असा इशारा जरांगे-पाटलांनी दिला.