नागपूरमध्ये पहिल्यांदाच ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. अवघ्या चार तासांमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी चार ते पाच फूट पाणी साचले. पंचशील चौक परिसरात रुग्णालयांची संख्या अधिक असून अनेक रुग्णालयांमध्येदेखील पाणी शिरले. तसेच शंकरनगरातील वोकहार्ट रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा युनिटही पाण्याखाली गेले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी परिस्थितीची माहिती देताना यात दुर्दैवाने एका आजींचा मृत्यू झाल्यांचंही सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “नागपूरमध्ये जवळपास ४ तासांमध्ये १०९ मिलीमीटर एवढा प्रचंड पाऊस झाला. त्यातील ९० मिलीलीटर पाऊस केवळ दोन तासात झाला आहे. त्यामुळे पावसाची प्रचंड तीव्रता पाहायला मिळाली. यामुळे आंबाजरी तलाव भरून पाणी वाहिलं. हे अतिरिक्त पाणी नाग नदीतून वाहतं. त्यामुळे नाग नदीला मोठ्या प्रमाणात पूर झाल्याची स्थिती निर्माण झाली.”

“नाग नदीच्या किनाऱ्यावरील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं”

“नाग नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. आंबाजरी ले आऊट, वर्मा ले आऊट, कार्पोरेशन कॉलनी, शंकरनगरपासून पूर्व नागपूर, दक्षिण नागपूर आणि नंदनवनपर्यंत नाग नदीच्या दोन्ही बाजूला पाणी शिरलं. तळ मजल्यात तर पाणी शिरलंच, पण अनेकांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आलं,”

“एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सैन्याच्या मिळून ६ टीम तैनात”

नागपूरचं मुख्य बसस्थानक असलेल्या मोरभवन येथे तर बसमध्ये पाणी शिरलं. त्या ठिकाणी प्रशासन तत्काळ कार्यरत झालं. नागपूरचे महापालिका आयुक्त, नागपूर जिल्हाधिकारी आणि संपूर्ण प्रशासकीय टीम तेथे कार्यरत होती. तत्काळ दोन एनडीआरएफच्या टीम, दोन एसडीआरएफच्या टीम आणि दोन सैन्याच्या टीम अशा ६ टीम तैनात करण्यात आल्या.

“दुर्दैवाने एका आजींचा मृत्यू”

जवळपास ४०० नागरिकांना पाण्यातून बाहेर काढण्यात आलं आहे. त्यांच्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यांच्या जेवणाचीही सोय करण्यात आली आहे. आता पाणी हळूहळू ओसरत आहे. मात्र, अद्यापही बऱ्याच भागांमध्ये पाणी पाहायला मिळत आहे. यात दुर्दैवाने एका आजींचा मृत्यू झाला आहे.

“एकूण १४ जनावरांचा मृत्यू झाला”

शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. प्रशासन पूर्णपणे जागरूक आहे. पाहणी करून पंचनामे करणं, तात्पुरती मदत असं काम सुरू आहे. याशिवाय एकूण १४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. लोकांना आमचं एकच आवाहन असणार आहे की, कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये. प्रशासन पूर्णपणे जागरूक आहे. कुठलीही अडचण असेल तर त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधावा.