राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडलेला असून आज शिंदे गटातील ९ आणि भाजपाच्या ९ नेत्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप झालेले संजय राठोड तसेच टीईटी परीक्षा घोटाळ्यात मुलींची नावे आलेले शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. याच मुद्द्यावरून शिंदे-भाजपा सरकारला लक्ष्य केलं जातंय. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ज्यांचे नेते सध्या जेलमध्ये असतील. तसेच ज्यांच्या अनेक नेत्यांवर खटले सुरू असतील अशा पक्षाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी अगोदर आरसा पाहावा, असे फडणवीस म्हणाले आहेत. तसेच संजय राठोड यांना देण्यात आलेल्या मंत्रिपदावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे, असेही फडणवीस म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा >>> “ते त्यांचं वैयक्तिक मत,” संजय राठोडांच्या मंत्रिपदाला चित्रा वाघ यांच्या विरोधानंतर भाजपाच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांवरील आरोपांची एक ट्विटर माळ प्रसिद्ध केली आहे. यावर फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ज्या पक्षाचे दोन नेते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये असतील आणि अनेक नेत्यांवर त्या ठिकाणी खटले सुरू असतील अशा पक्षाने यादी टाकण्याचा नैतिक अधिकार आहे का? त्यांनी अगोदर आरसा पाहावा आणि नंतर अशा प्रकारचे ट्वीट करावे,” असा टोला फडणवीस यांनी राष्ट्रवादीला लगावला. तसेच संजय राठोड यांच्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. यावर अधिक स्पष्टीकरण देण्याची गरज नाही,” असेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा >>> “बदनामी करणाऱ्यांना समोर…” मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सत्तारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
“मंत्रिमंडळ विस्तार होत नाही असे काही लोक बोलत होते. सरकार पडेल असेही काही लोक म्हणत होते. आता विस्तार झाला आहे. सरकारही मजबूत आहे. मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही असा आक्षेप घेतला जात आहे. हा गैरसमज लवकरच दूर होईल आणि आमच्या मंत्रिमंडळात महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल. याआधीच्या सरकारने विस्तार केला होते तेव्हा पाच मंत्री घेतले होते. त्यामध्ये कुठलीही महिला नव्हती. आता त्यांना असे बोलण्याचा काहीही अधिकार नाही,” असेदेखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.