नागपूरमध्ये भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत वामन मेश्राम यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. या आंदोलनावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. “एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या लोकांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर करण्याचा प्रयत्न होत असेल तर ते चुकीचं आहे,” असं मत फडणवीसांनी व्यक्त केलं. ते गुरुवारी (६ ऑक्टोबर) नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “धम्मचक्र प्रवर्तन दिवस आमच्यासाठी खूप पवित्र दिवस आहे. संपूर्ण देशातून लोक इथं येतात, तरीही कधी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होत नाही. लोक भक्तीभावाने येतात आणि दर्शन घेतात. काही वेळ व्यतीत करतात आणि परत जातात.”

“लोकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो”

“असं असताना एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या लोकांचा आपल्या राजकीय फायद्यासाठी वापर करण्याचा प्रयत्न होत असेल तर ते चुकीचं आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं.

“उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच पोलीस कारवाई”

“उच्च न्यायालयाने अशाप्रकारचं कोणतंही आंदोलन होणार नाही असे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसारच पोलीस कारवाई करत आहे,” असं म्हणत फडणवीसांनी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाईचं समर्थन केलं.

कोण कुणाचा स्क्रिप्टरायटर?

एकनाथ शिंदे भाजपाची स्क्रिप्ट घेऊन बोलतात, असा आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “असं जे म्हणत आहेत, त्यांनी आपला स्क्रिप्टरायटर बदलायला हवा. तेच ते, तेच ते.. किती वेळा तीच स्क्रिप्ट. एकतर तुमच्या स्क्रिप्टरायटरला क्रिएटिव्हिटी दाखवायला सांगा, नाहीतर नवीन स्क्रिप्टरायटर आणा. आम्हालाही हे ऐकून कंटाळा आला आहे”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

आंदोलन कशासाठी?

संघाची विचारधारा भारतीय संविधानाला धरून नाही, असे म्हणत भारत मुक्ती मोर्चाने आरएसएसच्या मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या मोर्चाला प्रशासनाची परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना रस्त्यातच रोखलं. पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.

संघाची विचारधारा ही भारतीय संविधानाला धरून नाही, असे म्हणत वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली भारत मुक्ती मोर्चाने आज नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. या मोर्चात सहभागी होण्यासाठी भारत मुक्ती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते नागपुरात दाखल झाले होते. मात्र पोलिसांनी या मोर्चाला पुढे जाऊ दिले नाही.

हेही वाचा : RSS च्या मुख्यालयावर मोर्चा नेल्याने पोलीस कारवाई, वामन मेश्राम म्हणाले, “लाखो लोकांनी…”

पोलिसांनी रोखल्यामुळे कार्यकर्त्यांना इंदौरी चौकामध्येच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत कार्यकर्त्यांची धरपकड केली. यावेळी आंदोलकांनी आरएसएसविरोधात घोषणाबाजी केली.