राज्यात येणारे महत्त्वाचे प्रकल्प गुजरातसह इतर राज्यांत जात असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. तर परराज्यात गेलेले प्रकल्प हे महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आहेत, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील प्रत्येक प्रकल्प गुजरातला जात असेल तर ते चुकीचे आहे, असे मत व्यक्त केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये लक्ष द्यावं, असं आवाहनही त्यांनी केले आहे. राज ठाकरेंच्या याच विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रितिक्रिया दिली आहे. मी राज ठाकरेंच्या मताशी सहमत आहे, असे फडणवीस म्हणाले आहेत. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा >>> तीन लाख कोटींचा ‘नाणार’ प्रकल्प महाराष्ट्रात होणार की नाही? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “केरळ आणि…”
“पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वच राज्यांना सारखी वागणूक देतात. मोदी सत्तेत आल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील सर्वाधिक पैसा हा महाराष्ट्रात गुंतवण्यात आला आहे. आपल्या राज्यातील प्रकल्प इतर राज्यात जाऊ नये. एखादा प्रकल्प आपल्याच राज्यात कसा राहील, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. राज ठाकरे यांच्या या मताशी मी समहत आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज ठाकरे काय म्हणाले?
प्रत्येक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जात आहे. मला असं वाटतं पंतप्रधानांनी स्वत: याकडे लक्ष देणं गरेजचं आहे. प्रत्येक गोष्ट जर गुजरातला जात असेल, तर मग राज ठाकरे ज्यावेळी महाराष्ट्राबद्दल बोलतो तेव्हा त्याला संकुचित म्हणण्यासारखं काय आहे?. मला वाटतं पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे. प्रत्येक राज्य मोठं झालं पाहिजे. प्रत्येक राज्यात उद्योगधंदे आले पाहिजेत. तिकडच्या लोकांना तिथून आपलं घर सोडून बाहेर जायची आणि दुसऱ्या राज्यावर ओझं बनण्याची आवश्यकता नाही. असे प्रकल्प जर समजा प्रत्येक राज्यांमध्ये गेले तर देशाचाच विकास होईल,” असे राज ठाकरे म्हणाले.