शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षात ठाकरे गट आणि शिंदे गट अशी विभागणी झालीय. अशातच दोन्ही गटांनी दसरा मेळाव्याची घोषणा करत जय्यत तयारी केली. त्यामुळे दसरा मेळाव्याला दोन्ही गटांकडून एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले होणार असल्याचं दिसतंय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांनाही टीका करताना मर्यादा पाळा असा सल्ला दिला. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मंगळवारी (४ ऑक्टोबर) मंत्रीमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
फडणवीस म्हणाले, “शरद पवार सल्ला देत आहे हे चांगलं आहे. त्यांनी असे सल्ले देत राहिलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या लोकांनाही असे सल्ले द्यावेत. थोडा अधिकचा सल्ला त्यांनी नाना पटोलेंनाही द्यावा.”
“हे निर्णय भाजपा घेतंय, की शिवसेना हे महत्त्वाचं नाही”
देवेंद्र फडणवीसांनी सर्वाधिक निर्णय भाजपा मंत्र्यांचे घेतले या टीकेलाही उत्तर दिलं. ते म्हणाले, “हे निर्णय भाजपा घेतंय, की शिवसेना घेतंय हे महत्त्वाचं नाही. हे निर्णय शासन घेतं. मंत्रिमंडळात निर्णयासाठी कोणताही विषय येतो, तेव्हा तो विषय मुख्यमंत्री ठेवत असतात आणि मग त्याला कॅबिनेट मान्यता देतं. विरोधकांना निर्णय घ्यायची सवयच नव्हती, आम्ही निर्णय घेणारे लोक आहोत.”
“ते फाईलवर बसणारे लोक”
“ते फाईलवर बसणारे लोक होते. त्यामुळे साहजिकच त्यांना त्याचं दुःख होणारच आहे. तीच मळमळ थोडी बाहेर येतेय,” असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
हेही वाचा : दसरा मेळावा, ‘भारत जोडो’मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा काय संबंध? ; शरद पवार यांचा सवाल
“विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण अशा सर्वच मागास राहिलेल्या भागांना प्रधान्य दिलं जाणार आहे. हे प्राधान्य देताना इतर भागांनाही समतोल प्राधान्य मिळावं असाही आमचा प्रयत्न आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.