मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनावले
भाजप-शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे वाटून घेण्यावरून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यात झालेल्या कलगीतुऱ्याच्या पाश्र्वभूमीवर युतीबद्दल मी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगू तेच फक्त अधिकृत असेल. त्याच्याशी विसंगत अशी विधाने कोणाकडूनही झाल्यास ती अधिकृत भूमिका समजू नये, अशा तिखट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही मंत्र्यांमधील वादावर तीव्र नापसंती व्यक्त केली.
भाजप-शिवसेनेच्या युतीची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्या पक्षाचा एक आमदार जास्त निवडून येईल त्या पक्षाचा मुख्यमंत्री, असे विधान केले होते. त्यावर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ठाकरे यांना दिल्याचे विधान करत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आगीत तेल ओतले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला. या पाश्र्वभूमीवर प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी युतीबद्दल मी व उद्धव ठाकरे सांगू तेवढेच फक्त अधिकृत समजावे, असे स्पष्ट केले.
रिपब्लिकन पक्षासह काही मित्रपक्ष लोकसभेच्या जागावाटपावरून नाराज असल्याबाबत विचारता, रामदास आठवले, महादेव जानकर, सदाभाऊ खोत यासारख्या मित्रपक्षाच्या नेत्यांशी भेट व चर्चा झाली आहे.
मित्रपक्षांची बैठकीही होत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजप व शिवसेना युती होती. दोन्ही पक्षांनी आपापल्या प्रत्येकी दोन जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या होत्या. याही वेळी मित्रपक्षांची काळजी घेऊ, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर मित्रपक्षांबरोबर खेळ सुरू असल्याच्या विरोधकांच्या आरोपाचा समाचार फडणवीस यांनी घेतला.