एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेतील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात काही लोक औरंगजेबाच्या घोषणा देताना दिसत आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी “महाराष्ट्रात आणि देशात औरंगजेबाचं रक्त कुणामध्येही नाही. या ठिकाणचे मुस्लीमही औरंगजेबाचे वंशज नाहीत,” असं मत व्यक्त केलं. ते रविवारी (२५ जून) नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी सातत्याने म्हणतो आहे की, या ‘औरंग्याच्या औलादी’ कुठून पैदा झाल्या? महाराष्ट्रात आणि देशात औरंगजेबाचं रक्त कुणामध्येही नाही. या ठिकाणचे मुस्लीमही औरंगजेबाचे वंशज नाहीत. औरंगजेब या देशावर राज्य करण्यासाठी, हिंदुंवर अत्याचार करण्यासाठी, आमच्या माताबहिणींची अब्रु लुटण्यासाठी आला होता.”
“ते महाराष्ट्रात काय घडवू इच्छितात हे लवकरच बाहेर येईल”
“औरंगजेबाच्या अत्याचाराच्या हजारो पानं गाथा लिहिता येतील. त्यामुळे औरंगजेब कुठल्याही राष्ट्रीय मुसलमानाचा मानक होऊ शकत नाही. त्यामुळे जे अशा घोषणा देत आहेत त्या औरंग्याच्या औलादी कोण आहेत, त्यामागे कोण आहे, त्यांचा हेतू काय आहे, ते महाराष्ट्रात काय घडवू इच्छित आहेत हे लवकरच बाहेर येईल,” असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला.
हेही वाचा : VIDEO: “देवेंद्र फडणवीसांनी या माजी मुख्यमंत्र्यांना अनेकदा…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा
“उद्धव ठाकरेंना उत्तर देणाऱ्या त्या ट्वीटने सर्व विक्रम मोडले”
उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी उद्धव ठाकरेंना एका ट्वीटने उत्तर दिलं. त्या ट्वीटला मिळालेल्या पाठिंब्याने आजपर्यंतचे सर्व विक्रम तुटले आहेत. त्यावरून तरी उद्धव ठाकरेंनी समजून घ्यायला हवं की, लोकांना काय अपेक्षित आहे.”
“”सगळीकडेच भाजपात पक्षप्रवेश, कारण…”
“सगळीकडेच भाजपात पक्षप्रवेश होत आहेत. कारण मोदींच्या नेतृत्वावर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. आत्ताच लोकांनी अमेरिकेतील मोदींची भेट बघतिली. भारताच्या पंतप्रधानांना अमेरिकेत असं समर्थन मिळणं हा त्या व्यक्तीचा सन्मान नाही, तर देशाचा सन्मान आहे,” असं फडणवीसांनी म्हटलं.
“हा मोदींचा नव्हे तर हा भारताचा सन्मान”
“मोदी हे निमित्त आहे, हा मोदींचा सन्मान होत नसून हा भारताचा सन्मान होत आहे. अमेरिकेची भरगच्च संसद मोदींसाठी उभे राहून टाळ्या वाजवते. त्यावेळी भारताचा सन्मान होतो,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.