शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. याआधी रविवारी (३१ जुलै) ईडीने राऊतांच्या मैत्री या बंगल्यावर छापेमारी करत कागदपत्रांची तपासणी केली. तसेच या छापेमारीदरम्यान संजय राऊतांची ९ तास चौकशी करण्यात आली. राऊतांवरील या कारवाईनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच या संकटकाळात मी तुमच्या सोबत आहे, असे आश्वास ठाकरे यांनी राऊत यांच्या कुटुंबीयांना दिले. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या याच भेटीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ठीक आहे. चांगले आहे, असे म्हणत या प्रकरणावर जास्त बोलण्यास टाळले आहे.
हेही वाचा >>> “ममता बॅनर्जी, केसीआर माझ्या संपर्कात,” विरोधकांच्या एकजुटीवर उद्धव ठाकरेंचे मोठे विधान
“आजच्या बैठकीत केंद्र सरकारच्या योजना प्रभावीपणे राबवण्यावर चर्चा करण्यात आली. कुठलीही तपास संस्था पुराव्यांच्या आधारावर कारवाई करते. त्याच पद्धतीने ईडीने कारवाई केली आहे. आता या प्रकरणावर न्यायालय काय तो निर्णय घेईल. मी यावर अधिक बोलणार नाही,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा >>> “संजय राऊतांचा मला अभिमान, काळ तुमच्यासोबतही…” ईडीच्या कारवाईनंतर उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा
तसेच उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या कुटुंबीयांची सोमवारी (१ ऑगस्ट) भेट घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. याबाबत प्रश्न विचारताच ठिक आहे. चांगले आहे, असे म्हणत फडणवीस यांनी अधिक बोलण्याचे टाळले.
हेही वाचा >>> “कोश्यारींसारख्यांना महाराष्ट्राचे पाच तुकडे करायचे आहेत”, आदित्य ठाकरेंचा राज्यपालांवर हल्लाबोल
देशात सर्व पक्ष संपणार असून फक्त भाजपा पक्षच राहणार आहे, असे वक्तव्य भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केले आहे. नड्डा यांच्या या वक्तव्यावर देशभरातून टीका केली जात आहे. नड्डा यांच्या या वक्तव्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जेपी नड्डा असे कोठेही म्हणालेले नाहीत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना राहिलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवी शिवसेना झाली आहे, असे नड्डा म्हणाले. ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेवर ते बोलले आहेत,” असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले.