मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने आज औरंगाबाद, नांदेडमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र औरंगाबादमधील शासकीय कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे सकाळी नऊऐवजी सात वाजताच आटोपण्यात आला. याच मुद्द्यावरून वाद पेटला आहे. ध्वजारोहणाचा कार्यक्रम लवकर आटोपल्यामुळे शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली करतऔरंगाबादमध्ये पुन्हा एकदा ध्वजारोहण केले. शिवसेनेच्या याच भूमिकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजचा दिवस हा शहिदांना नमन करण्याचा आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचे राजकारण करू नये, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
हेही वाचा >> माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन
मला वाटतं की हे दिवस राजकारणाच्या पलीकडे ठेवले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांना कार्यक्रम लवकर घेण्याची हौस नाही. हैदराबादला केंद्र सरकारच्या वतीने एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या ठिकाणी तीन राज्याचे मुख्यमंत्री येणार होते. तेथे मुख्यमंत्र्यांना जायचे होते. तो मुक्तीसंग्रामाचाच कार्यक्रम होता. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करून आजच्या दिवसाचे महत्त्व कमी करण्याचे काम चंद्रकांत खैरे किंवा शिवसेनेच्या कोणीही करू नये, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आजचा शहिदांना नमन करण्याचा दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवशीतरी शहिदांचा अपमान करू नका, असे म्हणत फडणवीसांनी चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला.
नेमकं घडलं काय?
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही औरंगाबादमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. औरंगाबादमधील विजयस्तंभाजवळ सकाळी सातच्या सुमारास ध्वजारोहण करण्यात आलं. मात्र, त्यावरून शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आली. मराठवाडा मुक्तीसंग्रामदिनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. एकनाथ शिंदे दिल्लीच्या पातशाहांच्या आदेशावरून निर्णय घेतात आणि त्यांच्या आदेशावरूनच हैदराबादला जात आहेत, अशा शब्दांत शिवसेनेचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं.