राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. मला करोनाची लागण झाली असून मी गृह विलगीकरणात असल्याचं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यात राजकीय नेतेमंडळींनाही करोनाची लागण झाल्याचं समोर येऊ लागलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून आपल्याला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

“माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी गृह विलगीकरणात आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करोनासंबंधित औषधं आणि उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात जे कुणी आले असाल, त्यांनी आपली करोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांनी काळजी घ्यावी”, असं ट्वीट फडणवीसांनी केलं आहे.

याआधी करोनाच्या पहिल्या लाटेत अर्थात ऑक्टोबर २०२०मध्ये देवेंद्र फडणवीसांना करोनाची लागण झाली होती. तेव्हा फडणवीसांनी खासगी रुग्णालयात न जाता सरकारी रुग्णालयात दाखल होत उपचार घेतले होते. त्यानंतर लवकरच ते बरे देखील झाले होते. आता पुन्हा एकदा त्यांना करोनाची लागण झाली असून ते लवकर बरे व्हावेत अशा आशयाचे संदेश मोठ्या संख्येने त्यांच्या ट्वीटवर येत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis corona positive bjp leader inform on twitter pmw