भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीसांना जळगावात काळे झेंडे दाखवले जातील, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ खडसे यांना नवीन मालक मिळाला आहे. नवीन मालक जसं सांगतील, त्याप्रमाणे एकनाथ खडसे वागतात, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली. ते जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एकनाथ खडसे यांनी जमिनीमध्ये तोंड काळं केलं नसतं तर त्यांना काळे झेंडे दाखवण्याची वेळ आली नसती, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

एकनाथ खडसे यांनी काळे झेंडे दाखवण्याचा इशारा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांची व कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माझं असं मत आहे की, कुणाचीही धरपकड करण्याची आवश्यकता नाही. काळे झेंडे दाखवून त्यांना काय मिळणार आहे. खरं म्हणजे एकनाथ खडसेंचं असं झालं आहे की, त्यांना नवीन मालक मिळाला आहे. त्या नवीन मालकाने सांगितलं तसं एकनाथ खडसे वागतात.”

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “एकनाथ खडसेंनी जमिनीमध्ये तोंड काळं केलं नसतं, तर काळे झेंडे दाखवायची वेळ त्यांच्यावर आली नसती. ते आमच्या परिवारात राहिले असते. त्यांना नवीन मालकाकडे जाण्याचीही गरज नव्हती. आम्ही अशा काळ्या झेंड्यांना घाबरणारे लोक नाहीत. असे काळे झेंडे कितीही दाखवले तरी काही फरक पडणार नाही. आम्ही जनतेसाठी काम करत आहोत. जनतेला फायदा देण्यासाठी आम्ही जळगावला आलो आहोत. जळगावची जनता आमच्याबरोबर आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis criticise eknath khadse over showing black flag jalgaon visit rmm
Show comments