राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला आहे. “अनेकदा जनतेने निवडून दिल्यावर लोकप्रतिनिधींना आपणच मालक आहोत, असं वाटतं,” असं वक्तव्य फडणवीसांनी केलं. तसेच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकप्रतिनिधी मालक नाही, तर सेवक आहे, असं सांगितल्याचंही त्यांनी नमूद केलं. ते सोमवारी (३ ऑक्टोबर) भंडाऱ्यात बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजपात आपण एक परंपरा केली आहे की, प्रत्येक लोकप्रतिनिधी जनतेला उत्तरदायी असला पाहिजे. त्यामुळे त्याने केलेल्या कामाचा लेखाजोखा त्याने जनतेसमोर मांडणं हे त्याचं कर्तव्य आहे. जनतेने निवडून दिल्यावर अनेकवेळा लोकप्रतिनिधींना आपणच मालक आहोत असं वाटतं, पण आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की, लोकप्रतिनिधी मालक नाही, तर सेवक आहे.”
“नेमकी काय सेवा केली याचा लेखाजोखा देणं अत्यंत महत्त्वाचं”
“सेवा करणं हा त्याचा धर्म आहे. सेवकाने आपले मालक असलेल्या जनतेला आपण नेमकी काय सेवा केली याचा लेखाजोखा देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या खासदारांनी संपूर्ण लेखाजोखा मांडला आहे. दोन लेखाजोख्याच्या पुस्तिका आहेत. एक नगरसेवक म्हणून पाण्याचे प्रयोग आणि वेगळे प्रयोग केले त्याचा लेखाजोखा आहे. मागील काळात भंडाऱ्याचं स्वरुप बदललं आहे,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.
“मागील काळात धाण खरेदीत भ्रष्टाचार झाला”
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “धाण उत्पादकांचा बोनस गेले काही वर्षे मिळत नाही. त्यांना अधिकची मदत झाली पाहिजे हा माझा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही मनोदय आहे. मागील काळात धाण खरेदीत भ्रष्टाचार झाला आणि बोनसच्या नावाच्या अनागोंदी कारभार झाला. हा कारभार बंद झाला पाहिजे. शेतकऱ्याचं धाण खरेदी झालंच पाहिजे आणि तेही वेळेत खरेदी व्हावं. त्यात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये.”
“मागच्या वेळी खरेदी केलेलं धाण सरकारला सापडलंच नाही”
“शेतकऱ्याच्या नावाने व्यापाऱ्याकडूनच धाण टाकलं जातंय. तेही होऊ नये. अशाप्रकारे अनेक बोगस संस्था तयार झाल्या. ज्यांच्याकडे जागा नाही, साठवणूक क्षमता नाही अशाही संस्था आहेत. भंडाऱ्यात मागच्या वेळी खरेदी केलेलं कागदावरील धाण गायब आहे. ते सरकारला सापडलंच नाही. ते आता शोधावं लागेल. ते धाण सापडलं नाही, तर ज्यांनी या धाणात भ्रष्टाचार केला त्यांना धरावं लागेल. कारण शेतकऱ्याशी कुठलीही बेईमानी सहन केली जाणार नाही,” असा इशारा फडणवीसांनी दिला.
हेही वाचा : भंडारा : पालकमंत्री येणार म्हणून रात्रभर जागून केली रस्त्यांची डागडुजी; नगर पालिकेचा प्रताप
“शेतकऱ्यांच्या नावाने दुसऱ्याने मदत लाटू नये”
“बोणस देण्याची पद्धत सुटसुटीत केली जाणार आहे. मदत देण्यासाठी नवीन पद्धतीवर आम्ही काम करत आहोत. शेतकऱ्यांच्या नावाने दुसऱ्याने मदत लाटू नये. म्हणून वेगळी व्यवस्था उभी केली जात आहे. त्याला बोणस म्हणा किंवा मदत म्हणा, पण यंदा आम्ही आमच्या शेतकऱ्याला चांगली भरगोस मदत देणार आहोत. लवकरच ही प्रक्रिया पारदर्शीपणे पूर्ण होईल,” असंही त्यांनी नमूद केलं.