उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर सडकून टीका केली. आज आमचे विरोधक सकाळपासून रात्रीपर्यंत टीकाच करतात, असा आरोप देवेंद्र फडणवीसांना केला. तसेच एक भोंगा सकाळी ९ वाजता सुरू होतो, असं म्हणत नाव न घेता शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते रविवारी (२७ ऑगस्ट) परभणीत आयोजित ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हे सरकार सामान्यांकरता काम करणारं सरकार आहे. आज आमचे विरोधक सकाळपासून रात्रीपर्यंत टीकाच करतात. सकाळी ९ वाजता एक भोंगा सुरू होतो आणि रात्री १० वाजेपर्यंत दुसरे भोंगे सुरू असतात. माझा यांना सवाल आहे. आमच्यावर पाहिजे तेवढी टीका करा, आम्ही टीकेला घाबरत नाही. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असं मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत.”

“ते काय केलं पाहिजे हे सांगू शकत नाही”

“मीही विरोधी पक्षात होतो, विरोधी पक्षनेता होतो. वर्षानुवर्षे विरोधी पक्षात काम केलं, पण ज्यावेळी सरकारवर टीका करायचो तेव्हा चांगलं काय झालं पाहिजे हेही सांगायचो. यांच्याकडे मात्र ते सांगण्यासारखं काहीच नाही. हे कुठली दिशा असली पाहिजे हे सांगू शकत नाही. काय केलं पाहिजे हे सांगू शकत नाही,” असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

व्हिडीओ पाहा :

“त्यांच्या भाषणांनी शेतकऱ्यांचं भलं होणार नाही”

फडणवीस पुढे म्हणाले, “खरं म्हणजे हा काही राजकीय मंच नाही, पण यांच्यातील एकही नेता विकासावर एकही शब्द बोलत नाही. त्यांच्या भाषणांनी गरिबी दूर होणार नाही, शेतकऱ्यांचं भलं होणार नाही. त्यांच्या टीकेमुळे शेतकऱ्याच्या पोटात दोन घास जाणार नाहीत. दीनदलित, गोरगरीब, शेतकरी, आदिवासी, शेतमजूर, महिला अल्पसंख्याक या सगळ्यांच्या जीवनात परिवर्तन करायचं असेल, तर मोदींच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार रोज करत असलेल्या परिवर्तनात सामील व्हा.”

हेही वाचा : पंतप्रधान मोदींवर शास्त्रज्ञांच्या कामाची प्रसिद्धी घेतल्याचा विरोधकांचा आरोप, फडणवीस म्हणाले…

“…तोपर्यंत आम्ही तिघेही स्वस्थ बसणार नाही”

“केवळ बोटं दाखवू नका. बोटं दाखवून ते कधीच कल्याण करू शकणार नाही. आम्ही तर कल्याणासाठी मैदानात उतरलो आहोत. पारदर्शी, प्रामाणिकपणे १८ तास काम करून सामान्य माणसाच्या जीवनात जोपर्यंत परिवर्तन होणार नाही तोपर्यंत आम्ही तिघेही स्वस्थ बसणार नाही,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis criticize opposition parties in parbhani pbs