विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला आहे. या सरकारने वेश्यांना द्यायच्या पैशातही डल्ला मारल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. तसेच वेश्यांच्या पैशात डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणतात हे मी सांगणार नाही, तो शब्द संजय राऊत नेहमी वापरतात. तोच शब्द या सरकारसाठी वापरावा लागेल, असं म्हणत त्यांनी टोला लगावला. ते गडचिरोलीत मविआ सरकारच्या विरोधात भाजपाने आयोजित केलेल्या महाजनआक्रोश मोर्चात बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या सरकारची नियत काय आहे बघा, केंद्र सरकारने सांगितलं करोना काळात दुर्दैवाने ज्या भगिनींना वेश्या व्यवसाय करावा लागतो त्यांना मदत करा. त्यांना मदत करण्याची घोषणा करण्याची घोषणा केली. आम्हाला वाटलं चला एका घटकाला तरी हे मदत करत आहेत, पण हे नालायक निघाले. नांदेडमधील केस आहे, मी परवा हे सभागृहात मांडलं.”
“या सरकारमध्ये वेश्यांना द्यायच्या पैशांवर डल्ला मारणारे डल्लेबाज”
“एका कुठल्यातरी संस्थेला पैसे दिले आणि त्यांनी वेश्यांना द्यायला हवे ते पैसे आपल्या नातेवाईकांमधील लोकांना वाटून टाकले. वेश्यांना द्यायच्या पैशातही डल्ला मारणाऱ्यांना काय म्हणतात हे मी सांगणार नाही. तो शब्द संजय राऊत नेहमी वापरतात. तुम्हाला देखील माहिती आहे. तो शब्द या सरकारसाठी वापरावा लागेल. कारण या सरकारमध्ये वेश्यांना द्यायच्या पैशांवर डल्ला मारणारे डल्लेबाज पाहायला मिळतात,” असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“मोदींचं नाव होईल म्हणून या सरकारनं गरिबांपर्यंत अन्नधान्य पोहचू दिलं नाही”
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “हे सरकार किती नालायक आहे, मोदींनी करोनाच्या काळात गेली दोन वर्षे आमच्या गरिबांकरता मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला. हजारो टन अन्नधान्य या महाराष्ट्रात आलं. अनेक गोडाऊनमध्ये तांदुळ-गहू सडला, पण मोदींचं नाव होईल म्हणून या सरकारनं त्या गरिबांपर्यंत अन्नधान्य देखील पोहचू दिलं नाही.”
“गरिबाच्या तोंडचा घास काढतात सरकार तुम्हाला काय न्याय देणार आहे?”
“जे गरिबाच्या तोंडचा घास काढतात ते सरकार तुम्हाला काय न्याय देणार आहे? त्यामुळे या अन्यायी सरकारच्या विरुद्ध जोपर्यंत आपण हल्लाबोल करत नाही, जोपर्यंत या सरकारच्या विरोधात संघटीत होत नाही, जोपर्यंत हा बुलंद आवाज मुंबईच्या मंत्रालयाला थरथर कापायला लावत नाही तोपर्यंत हे सरकार वठणीवर येणार नाही. म्हणून हा एल्गार आम्ही गडचिरोलीतून सुरू केलाय,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.
हेही वाचा : “तुमचं मुंबईवर प्रेम असेल, मुंबईकरांवर प्रेम असेल तर…”, मेट्रो श्रेयवादावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
यावेळी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक नेते, राजे अंबरिशराव आत्राम, आमदार देवराव होळी, कृष्णा गजबे, किर्तीकुमार भांगडिया आणि इतर नेते उपस्थित होते.