Devendra Fadnavis : महात्मा गांधी यांची आज जयंती आहे. या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. तसंच आज सकाळीच सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह प्रमुख काँग्रेस नेत्यांनी महात्मा गांधींच्या समाधी स्थळी जाऊन त्यांच्या स्मृतींना अभिवादन केलं. मुंबईतही काँग्रेस आणि महाविकास आघाडीची शांतता रॅली निघाली. आता या गांधी जयंतीच्या शुभेच्छा देताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसला महात्मा गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही, कारण काँगेसच्या नेत्यांनी महात्मा गांधींच्या सूचनेचं पालन केलं नाही असं म्हटलं आहे.
महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम
काँग्रेसकडून आज सकाळपासूनच सोशल मीडियावर गांधी जयंतीच्या निमित्ताने विविध संदेश पोस्ट केले जात आहेत. तसंच मुंबईतल्या शांतता रॅलीतही अनेकजण सहभागी झाले होते. तसंच गांधी जयंतीच्या निमित्ताने मुंबईतल्या मंत्रालयाजवळ असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला हार घालण्यात आला. काँग्रेसच्या नेत्यांनी या ठिकाणी जमत महात्मा गांधींच्या स्मृतींना अभिवादन दिलं. महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांना राष्ट्रपिताही म्हटलं जात होतं. २ ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी यांची जयंती. तर ३० जानेवारी ही महात्मा गांधी यांची पुण्यतिथी. सत्य आणि अहिंसा या दोन तत्त्वांवर त्यांची विचारधारा आधारलेली होती. काँग्रेस पक्षाला एक दिशा देण्याचं काम त्यांनी केलं. मात्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
हे पण वाचा- Devendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला आहे, त्यामुळेच…”; देवेंद्र फडणवीस यांची टीका
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
काँग्रेसला महात्मा गांधींबाबत आदर नाही. महात्मा गांधींना काँग्रेस मानत असतं तर महात्मा गांधींची सूचना त्यांनी अंमलात आणली नाही. महात्मा गांधी यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की स्वातंत्र्य मिळालं आहे, काँग्रेसची उपयुक्तता संपली आहे. आता काँग्रेसचं विसर्जन करावं. जर असं केलं नाही तर काँग्रेस पक्ष हा देशाच्या प्रगतीत अडथळा ठरेल. महात्मा गांधी यांच्या या सूचनेचं पालन जर काँग्रेसने केलं तरच त्यांना महात्मा गांधींवर बोलण्याचा अधिकार आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी महात्मा गांधीच्या जयंतीच्या निमित्ताने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर या प्रतिक्रियेची चर्चा होते आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याबाबत अद्याप कुठल्याही काँग्रेसने नेत्याने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.