रामनवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील अनेक भागात झालेल्या दंगलींच्या घटनांवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक वक्तव्य केलं आहे. रामनवमी आणि हनुमान जयंती राज्यात दंगली घडवण्यासाठीच आहे की काय, असं वाटू लागलंय, असं आव्हाड म्हणाले होते. आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, येणारं वर्ष हे जातीय दंगलींचं वर्ष असेल, कारण सत्ताधारी लोक देशातील तरुणांना नोकऱ्या देऊ शकत नाहीत. महागाई कमी करू शकत नाहीत, त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडे धार्मिक सोहळे करून मत मिळवण्याशिवाय पर्याय नाही”
आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर भारतीय जनता पार्टीकडून यावर प्रत्युत्तर आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जितेंद्र आव्हाडांचं हे वक्तव्य आक्षेपार्ह आहे. रानमवमी असो अथवा हनुमान जयंती, हे सण शांततेनं साजरे केले जातात. लोकांच्या मनात राम आणि हनुमंताबद्दल प्रचंड श्रद्धा आहे ती यावेळी व्यक्त केली जाते. दंगलींसाठी हे सण साजरे केले जात आहेत असं म्हणणं म्हणजे समस्त समाजाचा आणि रामभक्तांचा अपमान अपमान आहे, असं मला वाटतं.
हे ही वाचा >> “तानाजी सावंतांना शिक्षणमंत्री करणार होतो, पण…”, ठाणे रुग्णालयाच्या भूमिपूजनावेळी एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, म्हणाले…
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे. तसेच भविष्यात दंगली होतील असं वक्तव्य त्यांनी केलं आहे, याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? म्हणजे तुम्ही ठरवलं आहे का, येत्या काळात राज्यात जातीय दंगली घडवायच्या असं काही तुम्ही ठरवलं आहे का? मुळात अशा कोणत्याही घटनेबद्दल बोलताना नेत्यांनी थोडं संवेदनशीलपणे बोललं पाहिजे, वागलं पाहिजे.