राज्यातील रावणरूपी भ्रष्टाचारी व अत्याचारी, अन्यायचारी असे आघाडी सरकार आता उखडून टाकायचे आहे. रावणाची ही लंका बबनराव पाचपुते यांच्यासारख्या बिभीषणाच्या मदतीने नष्ट करावयाची आहे, असे उदगार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी श्रीगोंदे येथे शेतकरी मेळाव्यामध्ये सांगितले.
आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पाचपुते यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत शेतकरी मेळावा आयोजित केला होता. यानिमित्ताने पाचपुते यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे, आमदार राम शिंदे, बबनराव पाचपुते, बाबुराव पाचारणे, चंद्रशेखर कदम, बाबासाहेब भोस, सदाशिव पाचपुते आदी या वेळी उपस्थित होते.
फडणवीस यांनी राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीची अनेक वेळा खिल्ली उडवली. ते म्हणाले, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व शरद पवार यांच्यासह सर्व नेत्यांना स्वप्नातदेखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच दिसतात. राज्याचा विकास केल्याचे सांगताना भाक्रानांगल धरण दाखवले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्यामुळे त्यांना एक धरण बांधल्याचे दाखवता आले नाही. राज्याचे वाटोळे यांनी करण्याचे कोठेच सोडलेले नाही. उलट काँग्रेसच्या पुस्तकात राममंदिर केव्हा बांधणार असे म्हणत काँग्रेसच राममंदिर बांधण्यास पाठिंबा देत आहे. काँग्रेसने नरेंद्र मोदींना ९ प्रश्न विचारले आहेत. या पुस्तकातील १९ पैकी १३ पाने यांनी मोदींवर खर्च केली आहेत. मोदींचा प्रचार ख-या अर्थाने तेच करीत आहेत. पाचपुते ३० वर्षांनंतर पुन्हा स्वगृही आले आहेत. राज्यात नेमके काय होणार हे त्यांना समजले आहे. पक्षासाठी एवढे काम करूनही त्यांचा सतत अपमान करण्यात आला हे चांगले नाही. मात्र आता आम्ही पाचपुते यांना राज्यात काम करण्याची संधी देणार आहोत, मतदारांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे पणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.  
पाचपुते म्हणाले, राष्ट्रवादीचे राज्यातील अनेक आमदार व नेते आपल्या संपर्कात आहेत. त्या सर्वांना भाजपमध्ये आणणार. त्यासाठी राज्यभर फिरणार व पाचपुते काय चीज आहे हे अजित पवार यांना दाखवून देऊ. राष्ट्रवादी वाढवण्यासाठी मी घरादाराचा त्याग केला, मात्र त्यांनी मला सतत त्रास देत तिकिटाच्या रांगेत उभे केले. त्यांनी उमेदवारी दिली नाही तेव्हाही निवडून आलो व त्यांच्याबरोबरच गेलो. मात्र मला संपवण्याचा चंग अजित पवार यांनी बांधला होता. माझा कारखाना त्यांनी बंद पाडला, तो दिवाळीतखोरीत निघाला की पुन्हा विकत घेण्याचा त्यांचा डाव होता. शरद पवार यांना आपण आई-वडिलांच्या स्थानी मानले. मात्र त्यांनी कधीही मला मुलगा समजले नाही. तालुक्यात कुकडीचे पाण्यासाठी सतत त्रास दिला, असा आरोप पाचपुते यांनी केला.
मेटे, आमदार राम शिंदे, दत्ता हिरणवाळे आदींची या वेळी भाषणे झाली. सदाशिव पाचपुते यांनी बाळासाहेब नहाटा यांच्यावर अनेक गैरव्यवहाराचे आरोप केले.
गांधी, कर्डिले यांनी पाठ फिरवली
भाजपचे खासदार दिलीप गांधी व आमदार शिवाजी कर्डिले या प्रमुखांसह श्रीगोंद्यातील अनेक पदाधिका-यांनीही या मेळाव्याकडे पाठ फिरवली. याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा सुरू होती.  

Story img Loader