शिवसेनेत ४० आमदारांनी बंड केल्याने पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली राज्यात नवं सरकार स्थापन झालं. मात्र, शिवसेनेत बंडखोरी करताना अनेक आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवत असल्याचा आरोप केला होता. तोच धागा पकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी शिवसेनेच्या बंडखोरीचा फायदा राष्ट्रवादी घेत आहे का? असा सवाल विचारताच देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राष्ट्रवादी हा व्यावसायिक पक्ष आहे. त्यांनी पद्धतशीरपणे शिवसेनेला कमजोर केलं. नंतर तो पक्ष फुटण्यास बाध्य केले आणि रिक्त झालेली जागा भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, हिंदुत्त्वाला मानणारे जे मतदार आहेत, त्यांच्या सिद्धांतांच्या विरोधात राष्ट्रवादी सातत्याने काम करीत असल्याने ती रिक्त जागा भरून काढण्याची शक्यता कमी आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचा – “विमा कवच आणि नोकरीच्या आशेने…”; गोविंदाच्या मृत्यूनंतर किशोरी पेडणेकरांची शिंदे सरकारवर टीका

“भारत जोडो का तोडो यात्रेच्या…”

दरम्यान, राहुल गांधी केलेल्या वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना सवाल विचारला आहे. “राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे निषेध करणार आहे की नाहीत? भारत जोडो का तोडो यात्रेच्या स्वागतासाठी शिवसेनेचे नेते पाठवणार आहेत का? याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Story img Loader